शेवटचा अर्धा तास वादळी वाऱ्यासह पर्जन्यवृष्टी झाल्याने मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम
विठ्ठल ममताबादे
उरण : मावळ -३३ लोकसभा मतदार संघासाठी १३ मे २०२४ रोजी झालेल्या मतदानाच्या वेळी मतदारात निरुत्साह दिसत होता. सकाळी ७ :०० वाजता सुरू झालेल्या मतदानाच्या वेळी उरण विधानसभा – १९० मतदार संघातील उरण शहरात तुरळक तर उरण, पनवेल व खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागात काही प्रमाणात मतदार मतदानासाठी केंद्रावर पोहचले होते. पहिल्या तीन तासात अवघे ५ टक्के मतदान झाले होते. तर दुपारी ३:०० वाजेपर्यंत २९ टक्के मतदान झाले होते. सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान करण्याच्या शेवटी उरण विधानसभा १९० मतदार संघात एकूण सरासरी ५५.०५ टक्के एवढे मतदान झाले.

३३ मावळ लोकसभा मतदार संघात एकूण ३३ उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उभे होते. मात्र, या मतदार संघातील खरी लढत मागील १० वर्षे मावळ लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करीत असलेले विद्यमान खासदार श्रीरंग चंदू बारणे (शिवसेना शिंदे गट) आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर संजोग विकू वाघिरे पाटील (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्यातच झाली आहे. या सर्व उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात सीलबंद झाले असून, विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडते यासाठी पुढील ३ टप्प्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ४ जून २०२४ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
यावेळी मतदार आणि कार्यकर्ते यांच्यात निरुत्साह दिसत होता. मंदगतीने मतदानासाठी मतदार मतदान केंद्रावर जाऊन कोणत्याही प्रकारे गडबड न करता रांगेतच मतदानासाठी उभे असतांना दिसत होते. याशिवाय मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने विविध उपक्रम राबविले. यात युवकांसाठी खास सेल्फी आणि सजविण्यात आलेले मतदान केंद्र उभारण्यात आले होते. सायंकाळी ४:३० वाजण्याच्या सुमारास संपूर्ण उरण मतदार संघात उत्तरेकडून वादळी वाऱ्यासह पर्जन्यवृष्टी झाल्याने काही प्रमाणात घबराटीचे वातावरण निर्माण झाल्याने सायंकाळी मतदानासाठी जाणाऱ्या नागरिकांनी घरातून बाहेर न पडणे पसंत केले. त्यामुळे शेवटच्या अर्ध्या तासात काही प्रमाणात मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम झाल्याचे दिसून आले.
एकूणच ३३ – मावळ लोकसभा मतदार संघातील ३४४ मतदान केंद्रामध्ये नवीमुंबई पोलिस उपायुक्त परिमंडळ- २, पनवेलचे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांच्या आधिपत्त्याखाली मतदान प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊ नये यासाठी चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्याचप्रमाणे मतदान केंद्रातील अधिकारी आणि कर्मचारी यांनीही अधिक खबरदारी घेतल्याने किरकोळ प्रकार वगळता संपूर्ण उरण विधानसभा मतदार संघात मतदान शांततेत पार पडले असल्याची माहिती उरण विधानसभा मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जनार्दन कासार व अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उरणचे तहसिलदार डॉ. उद्धव कदम यांनी दिली आहे.