अभय पाटील
बोर्ली पंचतन : २ जुलै 2023 हा दिवस महाराष्ट्राच्या जनतेसाठी दुसऱ्यांदा राजकीय भूकंप अनुभवण्याचा दिवस होता. भारतीय जनता पार्टी व शिवसेना शिंदे गटासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार व त्यांचे सहकारी खासदार, आमदार यांनी सत्ताधारी पक्षाला साथ दिली. यामध्ये अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर इतर आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या आठ मंत्र्यांच्या यादीमध्ये श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आदिती तटकरे यांनी सलग दुसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली त्यामुळे श्रीवर्धन मतदारसंघांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आज सकाळपासूनच आदिती तटकरे यांचे सुतारवाडी या निवासस्थानी असंख्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, हितचिंतक यांनी त्यांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यामध्ये श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष महंमद मेमन, माजी जिल्हा परिषद सदस्य श्यामकांत भोकरे, श्रीवर्धन तालुका राष्ट्रवादी काँग्रेस नेते मंदार तोडणकर, सुजित पाटील, बोर्ली पंचतन शहराध्यक्ष संतोष गायकर यांनी देखील त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी श्रीवर्धन मतदारसंघाचे अध्यक्ष महंमद मेमन पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, श्रीवर्धन मतदार संघांमध्ये २००९ पासून विद्यमान खासदार सुनील तटकरे, तत्कालीन पालकमंत्री आमदार व आता पून्हा दुसऱ्यांदा मंत्री झालेल्या आदिती तटकरे त्याचप्रमाणे विधान परिषदेचे आमदार अनिकेत तटकरे यांच्या कार्य कुशलतेमुळे विकासकामांची गंगा वाहत आहे आणि याचमुळे श्रीवर्धन मतदारसंघांमध्ये फक्त आणि फक्त तटकरे यांच्याच नावाचा दबदबा राहणार हे निश्चित. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा एक नवा उत्साह संचारला असून आदिती तटकरे ह्या पुन्हा नामदार झाल्याने पक्षाची ताकद अजून मजबूत होईल व निश्चितच विकास निधी केव्हाही कमी पडणार नाही याची शाश्वती श्रीवर्धन मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाला आहे.
आदिती तटकरे यांनी मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देखील श्रीवर्धन मतदारसंघातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते खासदार सुनील तटकरे, आमदार अदिती तटकरे व आमदार अनिकेत तटकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत अशी प्रतिक्रिया महंमद मेमन यांनी दिली.