• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

कोल्हारे सरपंचांनी रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्ता केला मोकळा!

ByEditor

May 31, 2024

सरपंच महेश विरले यांचे ग्रामस्थांनी मानले आभार

गणेश पवार
कर्जत :
तालुक्यातील दुसरे महत्वाचे शहर म्हणजे नेरळ. याच नेरळ शहराला लागून कोल्हारे ग्रामपंचायतीची हद्द आहे. नेरळ पूर्व भागातून रेल्वे स्थानकात जाण्यासाठी असलेला रस्ता अरुंद होता. त्यामुळे येथे असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका जाणे देखील मुश्किल होते. मात्र, कोल्हारे ग्रामपंचायत सरपंच महेश विरले यांनी नागरिकांच्या सोयीसाठी येथील रस्त्यावरचे अतिक्रमण दूर करत रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्ता मोकळा केला आहे. दरम्यान, येथील रस्ता नव्याने करण्यात येणार असून प्रशस्त असा रस्ता नागरिकांच्या सोयीसाठी होईल असा विश्वास सरपंच विरले यांनी व्यक्त केला.

नेरळ शहराला लागून असलेल्या कोल्हारे ग्रामपंचायतीचा कायापालट सरपंच महेश विरले व त्यांच्या सहकार्यांनी मागील काही वर्षात केला आहे. अशात कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. तर जवळच नेरळ रेल्वे स्थानक देखील आहे. शहरात एकच शासकीय रुग्णालय असल्याने याठिकाणी दररोज शेकडो रुग्ण येत असतात. तर अपघात, अपघाताचे रुग्ण, गरोदर माता, शवविच्छेदनासाठी मृतदेह आदींसाठी रुग्णवाहिका येथे आणणे म्हणजे मोठे दिव्य असते. दरम्यान, याच ठिकाणी नेरळ पूर्व भागातून रेल्वे स्थानकाकडे जायला रस्ता असल्याने येथून दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. मात्र, रस्ता अरुंद असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. विशेषतः महिला वर्गाला येथून अनेक त्रासाला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे कोल्हारे ग्रामपंचायत सरपंच महेश विरले यांनी येथील रस्त्यासाठी ५ लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेत रस्त्यावरील अतिक्रमणावर हातोडा चालवला.

या रस्त्यावर असलेल्या समाजकल्याण विभागाने दिलेल्या टपऱ्यांचे देखील कधीही हलविता येतील अशा पद्धतीने पुनर्वसन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे येथील रस्ता सुसज्ज होऊन प्राथमिक आरोग्य केंद्र व प्रवासी वर्गासाठी सुसज्ज काँक्रीटचा रस्ता होणार असल्याने ग्रामस्थांनी महेश विरले यांचे आभार मानले आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!