घटनास्थळी पोहोचण्यासाठी अग्निशमन दलाला करावा लागला रस्त्यांवरील वाढत्या अतिक्रमणांचा सामना
अनंत नारंगीकर
उरण : चिरनेर ग्रामपंचायत हद्दीतील भंगाराच्या गोदामाला आग लागण्याची घटना शनिवारी (दि. १) सकाळी ठिक ९-३० च्या सुमारास घडली. आगीची तीव्रता इतकी होती की, आगीचे लोट हवेत उडाल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आगीचे कारण स्पष्ट झाले नाही. मात्र, सिडकोच्या अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

कोप्रोली नाक्यावरील गुप्ता सँडविच आणि ज्युस सेंटरच्या दुकानात गँस सिलिंडरचा स्फोट होण्याची घटना मंगळवारी (दि. २८ मे) घडली होती. या स्फोटाची तीव्रता कमी होत नाही तोच चिरनेर ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांच्या रहदारीच्या रस्त्याजवळ असणाऱ्या भंगाराच्या गोदामाला आग लागण्याची घटना शनिवारी (दि. १) सकाळी ९-३० च्या सुमारास घडली. सदर आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, गोदामातील माल जळून नष्ट झाला आहे. या आगीच्या घटनेची माहिती सिडकोच्या अग्निशमन दलाच्या जवानांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, अग्निशमन दलाच्या गाडीला रेंगाळत पडलेल्या कळंबुसरे बायपास रस्त्याचा सामना करावा लागला, तसेच वाट काढताना कळंबुसरे गावातील अंतर्गत रस्त्यांवरील वाढत्या अतिक्रमणांचाही सामना करावा लागला आहे.