• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

ग्रामसेवक पालकर यांच्या निलंबनाची मागणी

ByEditor

Jul 5, 2023

पाठराखण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करावी!

प्रतिनिधी
उरण :
माहितीच्या अधिकारात माहिती मागितली असता अनामत रक्कम भरूनही माहिती न देणाऱ्या ग्रामसेवक भास्कर पालकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी पत्रकार घन:श्याम कडू यांनी केली आहे. लेखी तक्रार अर्ज करूनही आजतागायत ३ गटविकास अधिकारी बदलून गेले व नवीन गटविकास अधिकारी आले तरी कारवाई होत नसल्याने अधिकारी वर्ग ग्रामसेवक पालकर यांची पाठराखण करीत असल्याचे उघड होते. यापूर्वी मोहपाडा व इतर ग्रामपंचायतमध्ये काम केलेल्या ग्रामपंचायतमधील ग्रामस्थांच्या तक्रारी प्रलंबित असल्याचे समजते.

उरण तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात शासकीय निधीत भ्रष्टाचार होत आहे. त्यामध्ये चाणजे ग्रामपंचायतीचा भ्रष्टाचार प्रकरण चव्हाट्यावर आले आहे. हा भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागवूनही ग्रामसेवक यांच्याकडून माहिती दिली जात नाही. पत्रकार घन:श्याम कडू यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागितली असता, सदर माहितीची अधिकृत शुल्क पावती फाडून त्यानंतरही माहिती मिळत नसल्याने अपील करूनही आजतागायत माहिती तत्कालीन ग्रामसेवक भास्कर पालकर यांनी दिलेली नाही. त्यामुळे चाणजे ग्रामपंचायतचे तत्कालीन ग्रामसेवक भास्कर पालकर यांनी कामात कामचुकार केल्याप्रकरणी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी पत्रकार घनश्याम कडू यांनी उरण पंचायत समिती गटविकास अधिकारी नीलम गाडे यांच्याकडे केली आहे. त्यावरही कारवाई करण्यास तत्कालीन गटविकास अधिकारी गाडे मॅडम यांनी चालढकलपणा केली, त्याचबरोबर तत्कालीन गटविकास अधिकारी संजय भोये व रजपूत यांनीही याकडे आर्थिक हितसबंधामुळे दुर्लक्ष करीत ग्रामसेवक पालकर यांना वाचविण्यासाठी प्रयत्न केला असल्याचे उघड होते.

चौदावा वित्त आयोग सन 2015 ते 2021 पर्यंतची सर्व माहिती तसेच मौजे चाणजे सिटी सर्व्हेच्या हद्दीत श्रॉफ व जयेश श्रॉफ यांच्या सुरू असलेल्या बांधकामांची माहिती असे माहितीच्या अधिकाराखाली दोन पत्राद्वारे माहिती दि. 20/7/2021 रोजी मागितली होती. त्यानंतर सदरची रोख रक्कम 7030 व 222 रुपये दि. 16/9/2021 रोजी भरली होती. तरीही माहिती देण्यात आली नव्हती. याबाबत पत्रकार घन:श्याम कडू यांनी उरण पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी नीलम गाडे यांच्याकडे दि. 30 मार्च 2022 रोजी लेखी तक्रार करून ग्रामसेवक पालकर यांच्या निलंबनाची मागणी केली होती.

तत्कालीन गटविकास अधिकारी निलम गाडे या सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी तत्कालीन गटविकास अधिकारी संजय भोये व रजपूत यांनी काम पाहिले होते. तसेच तत्कालीन ग्रामविस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) अनिल नारंगीकर आदी संबंधित अधिकारी वर्गाकडे याबाबत वारंवार विचारणा करूनही आजतागायत कोणतीच कारवाई न करता संबंधित ग्रामसेवकाची पाठराखण केली जात असल्याचे दिसत आहे. ग्रामविस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) विनोद मिंडे यांच्याकडेही यासंदर्भात विचारणा केली, तरीही कोणतीच कारवाई होताना दिसत नाही. नव्याने गटविकास अधिकारी पदाचा पदभार स्वीकारलेले समीर वठावकर यांच्याकडून काय कारवाई करतात याकडे तक्रारदाराचे लक्ष लागून राहिले आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी याची चौकशी करून कामचुकार करणार्‍या ग्रामसेवक पालकर यांच्यासह त्यांना पाठीशी घालणार्‍या उरण पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी व इतर अधिकारी वर्गावर कडक कारवाई करण्याची मागणी पत्रकार घन:श्याम कडू यांनी केली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!