अनंत नारंगीकर
उरण : कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतात असलेल्या उरण पोलीस ठाण्याच्या इमारतींना पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गळती लागत आहे. त्यामुळे यावर उपाययोजना करण्यासाठी पोलीस अधिकारी वर्गाने आपल्या कार्यालयातील महत्वाचे दस्ताऐवज पावसाच्या पाण्यात भिजवून जाऊ नये यासाठी पावसाळा सुरु होण्यापूर्वी गळक्या इमारतींना प्लास्टिकच्या ताडपत्रीचा आधार देण्याचे काम हाती घेतले आहे.
उरण तालुक्याचे औद्योगिकीकरण आणि नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. या तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महत्वाची भूमिका उरण पोलीस ठाण्याचे अधिकारी व पोलीस कर्मचारी बजावत आहेत. मात्र, सुसज्ज इमारतीचा अभाव यामुळे पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना जिर्ण व गळक्या इमारतीचा आधार घेऊन आपआपली कामे करावी लागत आहेत. त्यामुळे पावसाळ्यात पोलीस अधिकारी व कर्मचारी वर्गाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जात नसल्याने यावर्षीच्या पावसाळ्यात खबरदारी म्हणून पोलीसांनी आपल्या गळक्या कार्यालयाच्या छतावर चढून प्लास्टिकच्या ताडपत्रीचा आधार देण्याचे काम केले आहे.