जिल्ह्यातील राजकीय नेत्यांना राजकारणाची चिंता मात्र शिक्षणाचे तीनतेरा
मिलिंद माने
महाड : येत्या १५ जूनपासून शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत आहे. गेली महिनाभर बंद असलेल्या शाळा पुन्हा बोलक्या होतील. मात्र, रायगड जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांपैकी तेरा तालुक्यात गटशिक्षणाधिकाऱ्यांची पदे गेली दोन वर्षांपासून रिक्त आहेत. जिल्ह्यातील राजकीय नेत्यांना फक्त राजकारणाचे पडले आहे. यामुळे जिल्ह्यातील शिक्षणाचा बोजवारा उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रायगड जिल्ह्यात १५ तालुके असून पनवेल, उरण, कर्जत, खालापूर ,सुधागड, पेण, अलिबाग, रोहा, मुरुड, श्रीवर्धन, तळा, म्हसळा, माणगाव, महाड, पोलादपूर या १५ तालुक्यांपैकी केवळ खालापूर या तालुक्यातच गटशिक्षणाधिकारी उपलब्ध आहेत तर म्हसळा तालुक्यात गटशिक्षणाधिकारी पदाची नियुक्ती करण्यात आलेली आहे मात्र, अद्यापही त्या जागी संबंधित गटशिक्षणाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारला नाही. जिल्ह्यातील उर्वरित तेरा तालुक्यात अद्याप गटशिक्षणाधिकारी पद रिक्त आहे. राज्याचे शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून चालू होत असून या घटनेला केवळ एक आठवडा शिल्लक असताना राज्याचे व देशाचे राजकारण करणाऱ्या रायगड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना मात्र शालेय शिक्षणाबद्दल आस्था नसल्याचे दिसून येत आहे.
रायगड जिल्ह्यातील तेरा तालुक्यात गटशिक्षणाधिकारी पद गेले दोन वर्षाहून अधिक काळ रिक्त आहेत. यामुळे शैक्षणिक उपक्रम राबवताना किंवा प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत निर्णय घेताना तालुकास्तरावर अनंत अडचणी निर्माण झाल्या आहेत. शिक्षकांमधील असमन्वय वाढला आहे. तसेच तालुक्यामध्ये ग्रामीण भागात शिक्षण घेणाऱ्या मुलांना योग्य दर्जाचे शिक्षण मिळते आहे की नाही याचे नियंत्रण असणारे गटशिक्षणाधिकारीच उपलब्ध नसल्याने शिक्षणाचे तीन तेरा वाजले आहेत.
१५ जूनपासून पुन्हा शाळा सुरू होत आहेत. सुट्ट्या संपल्यानंतर शालेय मुलांना लागणारे शैक्षणिक साहित्य, शालेय कपडे त्याचबरोबर पोषण आहार आणि इतर शैक्षणिक उपक्रमाबाबत गटशिक्षण अधिकारी हे पद महत्त्वाचे ठरते. मात्र, गेली दोन वर्षापासून अनेक तालुक्यात हे पद रिक्त असल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. शैक्षणिक उपक्रम राबवताना अनंत अडचणींना शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. एकीकडे शिक्षणावर करोडो रुपये खर्च केल्याचे दाखवले जात असताना दुसरीकडे मात्र अनेक पदांची भरती होत नसल्याने शिक्षणाचे तीन तेरा वाजत आहेत. महाड तालुक्यात असलेले गटशिक्षणाधिकारी पद देखील दोन वर्षापासून रिक्त आहे. या ठिकाणी विस्तार अधिकारी असलेल्या सुनिता चांदोरकर यांना गटशिक्षणाधिकारी प्रभारी पद देण्यात आले मात्र, काही दिवसांनी त्यांची उपशिक्षणाधिकारी म्हणून देखील नियुक्ती केली गेली. यामुळे सुनीता चांदोरकर या कायम अलिबाग येथे असतात महाडमध्ये क्वचितच येत असतात.
विस्तार अधिकाऱ्यांकडे गटशिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार
रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यांपैकी १३ तालुक्यात गटशिक्षणाधिकारी पदाच्या जागा रिक्त आहेत. त्यांची नावे पुढीलप्रमाणे : पनवेल, उरण, कर्जत, सुधागड, पेण, अलिबाग, रोहा, मुरुड, श्रीवर्धन, तळा, माणगाव, महाड, पोलादपूर या तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार तालुक्यातील विस्तार अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आल्याचे जिल्हा शिक्षणाधिकारी पूनिता गुरव यांनी सांगितले. गटशिक्षणाधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत ती भरण्यासाठी शासनाकडे मागणी देखील केल्याचे त्यांनी सांगितले.