• Sat. Jul 26th, 2025 11:58:09 PM

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरण व कर्जत आमदारांसाठी धोक्याची घंटा!

ByEditor

Jun 11, 2024

घनःश्याम कडू
उरण :
नुकताच लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. त्यामध्ये मावळ लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी विजयाची हॅट्रिक केली आहे. परंतु, विधानसभा निवडणूक निकाल बघता उरण व कर्जत विधानसभा मतदार संघात महायुतीचे आमदार असतानाही महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना आघाडी मिळाल्याने या आमदारांसाठी धोक्याची घंटा असल्याचे दिसत आहे. मात्र, या आघाडीने विरोधकांनीही हुरळून जाऊ नये असा इशाराच या दोन मतदार संघातील मतदारांनी दिला आहे.

मावळ लोकसभा मतदार संघातील 6 विधानसभा मतदार संघात महायुतीचे आमदार असतानाही 4 मतदार संघात मिळालेल्या आघाडीमुळे बारणे यांना हॅट्रिक करणे शक्य झाले आहे. मात्र मागील निवडणुकीत साथ दिलेल्या उरण व कर्जत मतदार संघात पीछेहाट झाली आहे. या दोन्ही मतदार संघात आघाडीचे वाघेरे पाटील यांना आघाडी मिळाली आहे. मागील वेळी 1 लाख 70 हजारापेक्षा जास्त मताधिक्य मिळवून विजयी झालेले बारणे यांना यावेळी ही आघाडी टिकविण्यात यश आले नाही. यंदा 96 हजाराच्या मताधिक्याने बारणे निवडून आले आहेत. यावरून त्यांच्या मताधिक्यात घट होताना दिसत आहे. घाटाखालील मतदार संघातील पनवेल विधानसभा मतदार संघात बारणे यांना मागील निवडणुकीत 54 हजाराची आघाडी मिळाली होती. यावेळी बारणे यांना 31 हजाराची आघाडी मिळाली आहे. तर भाजपाचे आमदार महेश बालदी यांच्या उरण विधानसभा मतदार संघात आघाडीचे वाघेरे पाटील यांना 13 हजारापेक्षा जास्त मताधिक्य मिळाले. तसेच आमदार महेंद्र थोरवे हे शिवसेनेचे असतानाही त्यांच्या कर्जत विधानसभा मतदार संघात शिवसेनेच्या बारणे यांच्यापेक्षा आघाडीचे वाघेरे पाटील यांना 17 हजारापेक्षा जास्त मताधिक्य मिळाले आहे.

उरण व कर्जत विधानसभा मतदार संघातील विरोधी उमेदवाराला मिळालेली आघाडी ही आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत एकप्रकारे धोक्याची घंटा असल्याचे बोलले जात आहे. मात्र विरोधकांनी मिळालेल्या आघाडीने हूरळून जाऊ नये ही आघाडी मोडलीही जाऊ शकते हे धान्यात घ्यावे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!