• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरणमध्ये लोन घोटाळा!

ByEditor

Jun 12, 2024

अमर मोबाईल शॉपचे मॅनेजर सागर कोळी व मालक अमर केंद्रे यांच्याकडून ग्राहकांची आर्थिक फसवणूक

दोघांवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी

विठ्ठल ममताबादे
उरण :
उरणमधील रहिवाशी तसेच इतर अनेक रहिवाशी यांची लोनच्या (कर्जाच्या) आर्थिक प्रकरणात अमर मोबाईल शॉपचे मॅनेजर सागर कोळी व प्रोपायटर अमर केंद्रे यांनी फसवणूक केली असून पीडित व्यक्तींनी एकत्र येत उरण तालुक्यातील उरण पोलीस स्टेशनमध्ये संबंधित फसवणूक करणाऱ्या अमर मोबाईल शॉपचे मॅनेजर सागर कोळी व प्रोपायटर अमर केंद्रे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. शकडो ग्राहकांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे या उरणमधील नवीन आर्थिक फसवणूक प्रकरणामुळे उरणमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

अजय विजय पाटील (रा. केगाव दांडा), दीपक अशोक मोरे (रा. गणेशनगर उरण), रुपाली शैलेश किल्लेकर (रा. डाऊरनगर), सागर शरद वाघमारे (रा. डाऊरनगर), अनिल राजाराम घुटुकडे (रा. बोकडविरा), जितेंद्र नारायण थळे (रा. मुळेखंड) हे अर्जदार (तक्रारदार) उरण येथील कायमस्वरुपी रहिवाशी असुन हे ग्राहक अमर ग्लोबल मोबाईल शॉप (पत्ता – कामठा रोड, उरण शहर , ता. उरण, जि. रायगड) येथील मॅनेजर सागर कोळी व प्रोप्रायटर अमर केंद्रे यांच्या शॉपमध्ये वारंवार खरेदी-विक्री करण्यासाठी जात असल्यामुळे त्यांच्यासोबत सदर ग्राहकांची ओळख झाली होती. त्यानंतर अमर ग्लोबल मोबाईल शॉप येथील मॅनेजर सागर कोळी ह्याने सदर नागरिकांना विश्वासात घेऊन वेगवेगळ्या तारखेला बोलावून, त्यांना त्यांचे नावे लोन काढण्यासाठी ऑफर दिली व त्यापासुन त्यांना कौटुंबिक खर्चासाठी मदत म्हणुन फायदे मिळतील असे मॅनेजर व प्रोपायटर यांनी ग्राहकांना आमिष दाखविले. तसेच प्रोप्रायटर अमर केंद्रे यांनी सदर लोनबाबत ग्राहकांना आश्वासन दिल्यामुळे ग्राहकांनी मॅनेजर सागर कोळी यांच्या शब्दांवर पुर्णपणे विश्वास ठेवला. ग्राहकांना देखील कौटुंबिक व मुलांच्या शिक्षणाच्या खर्चासाठी मदत मिळणार म्हणुन ग्राहकांनी अमर शॉपच्या मॅनेजर व प्रोप्रायटर यांना लोन काढण्यासाठी परवानगी दिली. तसेच सदर लोनचे हफ्ते मॅनेजर सागर कोळी हा भरणा करेल असे त्यांनी ग्राहकांना सांगितले होते. त्यावेळी प्रोप्रायटर अमर केंद्रे ह्याने देखील सदर लोनबाबत ग्राहकांना तुम्ही लोनचे हप्ते भरू नका आम्ही सर्व लोनचे हप्ते भरू असे आश्वासन देवून गॅरंटी दिली होती. त्यानंतर मॅनेजर सागर कोळी ह्याने ग्राहकांच्या नावाने ऑनलाईन लोन काढले आहे. परंतु, मागील काही महिन्यांपासुन अमर ग्लोबल मोबाईल शॉप येथील मॅनेजर सागर कोळी याने ग्राहकांच्या नावाने लोन काढले असुन सदर लोनच्या हफ्त्याची रक्कम त्याने भरलेली नाही. त्यामुळे ग्राहकांना मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. तसेच सदर लोनसाठी आश्वासन देवून अमर ग्लोबल मोबाईल शॉप येथील प्रोप्रायटर अमर केंद्रे याने अनेक सामान्य नागरिकांची / ग्राहकांची फसवणुक करुन फरार झाला आहे आणि मॅनेजर सागर कोळी ह्याने ग्राहकांच्या नावाने मोठ्या रक्कमेचे लोन काढले असुन सदर बाबत त्याला विचारणा केली असता, तो “तुम्हाला काय करायचे आहे ते करा” असे सांगुन ग्राहकांना पुर्णपणे नकार देत असुन, ग्राहकांना दमदाटी करीत आहे.

अशाप्रकारे अमर ग्लोबल मोबाईल शॉप येथील मॅनेजर सागर कोळी व प्रोप्रायटर अमर केंद्रे यांनी ग्राहकांचा विश्वासघात करुन अनेक सर्वसामान्य ग्राहकांची पुर्णपणे फसवणुक केली आहे. त्यांच्या फसवणुकीमुळे ग्राहकांना खुप मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. तरी पोलीस प्रशासनाने मॅनेजर सागर कोळी व प्रोप्रायटर अमर केंद्रे यांच्याविरुध्द कायदेशिर कारवाई करावी व फसवणूक झालेल्या ग्राहकांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी अजय विजय पाटील, दीपक अशोक मोरे, रुपाली शैलेश किल्लेकर, सागर शरद वाघमारे, अनिल राजाराम घुटुकडे, जितेंद्र नारायण थळे तसेच अनेक तक्रारदारांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. आता या संबंधित फसवणूक प्रकरणातील अमर मोबाईल शॉपचे मॅनेजर सागर कोळी, प्रोपायटर अमर केंद्रे यांच्यावर कोणती कारवाई होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

फसवणूक झालेल्या तक्रारदारांनी माझी भेट घेतली आहे. अमर मोबाईल शॉपच्या अमर केंद्रे यांना याबाबत कळविले आहे. अमर केंद्रे यांनी सर्व ग्राहकांचे पैसे देतो असे कबूल केले आहे. अमर केंद्रे याला आठ दिवसांची मुदत दिली होती. फसवणूक झालेल्या नागरिकांचे पैसे त्यांना परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.

-राजेंद्र कोते-पाटील
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उरण.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!