अनंत नारंगीकर
उरण : तळ्यात बुडणाऱ्या सात वर्षांच्या मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात दुदैवी आई आणि मुलाचा बूडून मृत्यू झाल्याची घटना उरण तालुक्यातील पिरकोन गावात घडली.
उरण तालुक्यातील पिरकोन गावात निरा पाटील (२५) व त्यांचा मुलगा रिहान पाटील (७) गावातील तळ्यावर संध्याकाळी कपडे धुण्यासाठी गेले होते. आई कपडे धुण्याच्या कामात व्यस्त असताना अचानक रिहानचा पाय पायरीवरून घसरला आणि तो तळ्यात गटांगळ्या खाऊ लागला. रिहानला बुडताना पाहून वाचवण्यासाठी आईने थेट तळ्यात उडी घेतली. मात्र, मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात दोघांचाही दुर्दैवाने बुडून मृत्यू झाला.
तळ्यात कपडे धुण्यासाठी गेलेले मायलेक संध्याकाळी साडेसात वाजले तरी घरी परत आले नाहीत. यामुळे काळजीत पडलेल्या नीरा यांचे सासरे तळ्याकाठी पाहण्यासाठी आले. त्यांना तळ्याकाठी धुवण्यासाठी आणलेले कपडे व चपला दिसल्या. मात्र, सुन निरा व नातू रिहान काही दिसले नाहीत. त्यामुळे त्यांनी आजूबाजूला शोध घेतला. त्यानंतर तळ्यात तर बुडाले नसतील ना? अशी शंका त्यांच्या मनात आली व त्यांनी आरडाओरडा सुरू केला. त्यांचा आरडा-ओरडा ऐकून ग्रामस्थ तळ्याकाठी आले. त्यांनी तळ्यात शोध घेतला असता आई आणि मुलगा रिहान बुडालेल्या अवस्थेतही एकमेकांच्या हातात हात घालून मृत्युमुखी पडल्याचे हृदयद्रावक दृश्य पहायला मिळाले. दोघांचाही नाकातोंडात पाणी जाऊन मृत्यू झाला होता. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी दिली. मात्र, माय-लेकराचा अशा रीतीने दुदैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.