विनायक पाटील
पेण : जागतिक स्तरावर साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे यंदाचे दहावे वर्ष आहे. राज्यभर आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विविध कार्यक्रम साजरे करण्यासाठी जोमाने तयारी सुरु असून भारतीय जनता पार्टीतर्फे प्रत्येक मंडलामध्ये विशेष कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार धैर्यशिल पाटील यांनी दिली.
यंदा महिला सक्षमीकरणासाठी योग या संकल्पनेवर आधारीत आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा होणार आहे. दि. २१ जून रोजी श्रीनगरमधील दाल सरोवराच्या किनारी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत, असेही दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार धैर्यशिल पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात दि. २१ जूनला राबवल्या जाणाऱ्या उपक्रमा अंतर्गत देशभर यंदा विविध कार्यक्रम होणार आहेत. योग दिनी राज्यभरात राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमाअंतर्गत यंदा दि. २१ जून रोजी पक्ष संघटना रचनेतील सर्व मंडलांमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे, असेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचा समृध्द ठेवा असलेल्या योगसाधनेला जागतिक स्तरावर नेले आणि त्यांच्या संकल्पनेतूनच जगभर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. स्पर्धात्मक आणि धकाधकीच्या आयुष्यात तणावमुक्त राहण्यासाठी शारीरिक व मानसिक आरोग्याची आवश्यकता आहे. त्यासाठी योगसाधना गरजेची आहे हे पटवून देण्यासाठी हा दिवस जगभरात साजरा केला जातो. भारतीय जनता पार्टी तर्फे ही योग दिनानिमित्त देशात तसेच राज्यातही विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.