• Thu. Jun 26th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

अमर ग्लोबल मोबाईल शॉप व्यवसायिकांनी बँक लोनच्या नावाखाली अनेकांची केली फसवणूक

ByEditor

Jun 18, 2024

सतीश गावंडच्या प्रकरणानंतर उरणमध्ये पुन्हा एकदा करोडो रुपयांची लूट; लूट करणारा इसम फरार

अनंत नारंगीकर
उरण :
सतीश गावंडच्या चिटफंड प्रकरणातून उरण परिसरातील जनता सावरत नाही तोच उरण शहरातील अमर ग्लोबल मोबाईल शॉप येथील व्यवसायिकांनी ऑनलाइन मोबाईल खरेदी व बँकमधील लोन प्रकरणातून अनेक ग्राहकांना लाखोंचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात काही पिडीतांनी उरण पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला असल्याची माहिती फसवणूक झालेल्यांपैकी एक असलेले अजय शिवकरयांनी दिली आहे.

या प्रकरणात फसवणूक झालेले अजय शिवकर यांनी आपली कशा पद्धतीने फसवणूक झाली आहे ते सांगताना म्हटले आहे की, मला घरगुती खर्चासाठी पंधरा ते वीस हजाराची गरज होती. मी माझ्या मित्रांना लोन विषयी याबद्दल विचारले होते, अमर केंद्रेला माहिती होताच तो स्वतः माझ्याकडे येऊन त्याने मी हे काम करतो असे सांगितले. तसा तो माझ्या आधीपासून परिचयाचा होता. त्याने सांगितले की, मी मोबाईलद्वारे शेकडो लोकांना लोन दिले, तशी त्याने त्यांची लिस्ट दाखवली. मी विश्वासाने त्याला माझे सर्व डॉक्युमेंट्स दिले. सिस्टीम चालत नाही म्हणून माझ्याकडे मोबाईल राहू दे म्हणून त्यांनी विश्वास देऊन मोबाईल स्वतः जवळ ठेवला. त्यानंतर त्याने मला सांगितलं की, तुझ्या मोबाईलवर मी दीड लाखाचे लोन घेतले आहे. एवढी रक्कम तुला तर नको आहे तू फक्त वीस हजार ठेवून एक लाख तीस हजार मला रिटर्न दे बाकी सगळे लोनचे हप्ते मी स्वतः भरेन. त्याच्या गोड बोलण्यावर आणि त्यांच्या मित्रांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून मी एक लाख तीस हजार रुपये त्याला ऑनलाईन परत केले. परंतु दुसरा महिना आल्यावर हप्त्याच्या तारखेला त्याने मोबाईलचा हप्ता भरलाच नाही. उलट माझ्या अकाउंटमधील सर्व पैसे हप्त्याच्या रूपाने काढून घेतले. त्यानंतर मला समजले की माझ्या नावावर एकच नाही तर अजून चार लोन काढलेले आहेत. त्यात एक दीड लाखाचा कॅश टर्म लोन, एक दीड लाखाचा मोबाईल, एक पन्नास हजाराचा मोबाईल, एक साठ हजाराचा लॅपटॉप अशी पाच ते साडेपाच लाखाची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.

यासंदर्भात मी उरण शहरातील अमर ग्लोबल मोबाईल शॉप व्यावसायिकांच्या दुकानाकडे आपल्या फसवणूक झाल्याची माहिती घेण्यासाठी गेलो असता.सदर शॉपचे शटर बंद असल्याचे दिसून आले. एकंदरी माझ्याप्रमाणे जवळ जवळ ३०० जणांची फसवणूक झाल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी आम्ही पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे. तरी उरण पोलीसांनी या प्रकरणी लक्ष केंद्रित करावे जेणेकरून यापुढे कोणाचीही फसवणूक होणार नाही असे आवाहन शेवटी फसवणूक झालेल्या अजय शिवकर यांनी केले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!