अनंत नारंगीकर
उरण : उरण तहसील कार्यालयाजवळील शौचालयाची भयानक दुरावस्था झाली आहे. त्यामुळे शासकीय अधिकारी, तहसील कार्यालयात ये-जा करणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यात सर्वत्र दुर्गंधी पसरत असल्याने पावसाळ्यात रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण होणार अशी भीती चक्क शासकीय अधिकारी वर्ग व्यक्त करत आहेत. तरी सदर शौचालयाची स्वच्छता व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
उरण तहसील व उरण पोलीस ठाण्यातील कर्मचारी व संबंधित शासकीय कार्यालयात ये-जा करणाऱ्या नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी शासकीय निधीतून उरण तहसील कार्यालयाजवळ सुसज्ज पुरुष व महिलांसाठी शौचालयाची उभारणी करण्यात आली होती. मागील वर्षभरापासून या स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेकडे उरण तहसील व पोलीस वर्गाने तसेच उरण नगरपालिकेकडून दुर्लक्ष होत असल्याने सध्या या शौचालयांची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. पाण्याची व्यवस्था नसल्याने दुर्गंधी सुटली असून शौचालयाचा वापर करणे कठीण झाल्याने अनेक नागरिक उघड्यावर लघुशंकेकरिता जात आहेत. मात्र, महिलांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. तरी उरण तहसील व पोलीस ठाण्याचे अधिकारी तसेच उरण नगरपालिकेने शौचालयांची स्वच्छता व दुरुस्तीचे काम करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे.