अनंत नारंगीकर
उरण : उरण चारफाटा येथे सिडकोच्या माध्यमातून निर्माण करण्यात येत असलेल्या मच्छी मार्केटचे काम पूर्णत्वास येत असून मच्छविक्रेत्या कोळी महिलांची गैरसोय दूर होणार आहे. त्यामुळे त्यांच्याकडून आनंद व्यक्त होत आहे. सदर मच्छी मार्केटच्या बांधकामासाठी सिडकोने सुमारे ४ कोटींचा निधी खर्च केला आहे.

उरण चार फाटा येथे मच्छी विक्रेत्या कोळी महिलांना मासे विक्री करताना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सदर जागेवर सुसज्ज मच्छी मार्केटची उभारणी करण्यात यावी अशी मागणी चाणजे ग्रुप ग्रामपंचायत, उरणचे माजी आमदार मनोहर भोईर व आमदार महेश बालदी यांच्याकडून वारंवार करण्यात येत होती. या मागणीची दखल सिडकोने घेऊन सुमारे ४ कोटींचा निधी खर्च करुन नव्याने अद्ययावत मच्छीमार्केट निर्माण करण्याचे काम हाती घेतले आहे. सदर मच्छी मार्केटचे काम लवकरच पूर्ण होऊन ते मच्छविक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मासळी विक्रेत्या महिलांची गैरसोय दूर होणार आहे. सुमारे ४ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येत असलेल्या चार फाटा येथील मच्छी मार्केटच्या कामासंदर्भात द्रोणागिरी विभागाचे सिडकोचे कार्यकारी अभियंता मोहन मुंडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.