• Fri. Jun 27th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

वटपौर्णिमेच्या पूजेदरम्यान महिलांवर मधमाश्यांचा हल्ला, 14 महिला जखमी

ByEditor

Jun 21, 2024

वार्ताहर
पोलादपूर :
वट सावित्रीची पूजा करण्यासाठी गेलेल्या महिलांवर मधमाश्यांनी हल्ला केला. पोलादपूर तालुक्यातील निवे गावात हि घटना घडली. मधमाशा चालवल्यामुळे 14 महिला जखमी झाल्या आहेत. यावेळी एका पुरुषालादेखील मधमाशांनी कडाडून चावे घेतल्याचे समोर आले आहे. जखमी झालेल्या रूग्णांना पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये रूग्णवाहिकेने दाखल करण्यात आले असून सर्वांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे.

पोलादपूर तालुक्यात सर्वत्र सव्वाशिणींचा वटसावित्रीपूजनाचा सण आनंदात आणि उत्साहामध्ये सुरू असताना अचानक पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये तब्बल ११ महिला आणि १ पुरूष असे १२ जण मधमाशांच्या डंखाने बेजार झाल्याने दाखल करण्यात आल्याची माहिती थडकली. या बातमीने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. निवे गावातील वटवृक्षाखाली पाच-सहा महिलांची पूजा झाल्यानंतर आणखी चार पाच जणी वटवृक्षाखाली पुजेसाठी जमल्या. यामुळे सर्वांच्या पुजेनंतर नारळ फोडण्यासाठी महिलांनी साधारण १०० फूट अंतरावर शेतात बांधांवरील गवताची बेणणी करणाऱ्या अनंत नाना तळेकर यांना हाक मारून बोलावून घेतले. यावेळी अनंत तळेकर यांनी नारळावरील सालं काढून तो फोडण्यासाठी आपटणार तोच हजारो मधमाशांनी त्यांना वेढले आणि चावे घेण्यास सुरूवात केली. यावेळी महिलांनादेखील मधमाशांनी डंख करण्यास सुरूवात केली.

अशा अवस्थेत अनंत तळेकर यांनी जवळच्या मंदिरामध्ये सर्व महिलांना जाण्यास सांगून मंदिरात पोहोचल्यानंतर मंदिराचा दरवाजादेखील बंद करून घेतला. मात्र, तोपर्यंत महिलांना मधमाशांनी डोक्यावरील केसांमध्ये, चेहऱ्यावर तसेच हातावर आणि मानेवर दंश केल्याने सर्वांनाच वेदना असह्य होऊन त्या मंदिरामध्ये लोळू लागल्या. यानंतर काही वेळाने मधमाशा पांगल्या आणि अनंत तळेकर आणि सर्व महिलांनी ग्रामस्थांशी संपर्क साधून पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये सर्व १२ जणांना १०८ आणि १०२ रूग्णवाहिकेने दाखल केले. यावेळी १०८ रूग्णवाहिकेवरील डॉ. नागरे आणि चालक निकम तसेच १०२ वरील चालक किरण कळंबे यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून रूग्णांना स्थानिक तरूणांच्या मदतीने पोलादपूर रूग्णालयामध्ये आणण्याकरिता तत्परता दाखविली.

पोलादपूर ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकीय सहकाऱ्यांनी वनिता बबन चिकणे, कविता नितीन चिकणे, दिपाली सचिन चिकणे, पार्वती भाऊ तळेकर, ज्योती जगदीश तळेकर, अनुसया गणपत तळेकर, सुशिला विश्वनाथ तळेकर, शेवंती पांडूरंग तळेकर, भारती बाबाजी तळेकर, गीता ज्ञानेश्वर तळेकर, शैला अनंत तळेकर आणि अनंत नाना तळेकर यांच्यावर तातडीने मधुमक्षिका डंखावरील उपचार सुरू केले. यानंतर सर्वांच्या प्रकृती सुधारत असल्याचे वैद्यकीय परिचारिकांनी सांगितले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!