• Fri. Jun 27th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

माणगावजवळ अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; महिलेचा मृत्यू १ जखमी

ByEditor

May 19, 2023

सलीम शेख
माणगाव :
माणगावपासून १२ किमी अंतरावर असणाऱ्या भुवन गावच्या हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक लागून झालेल्या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या महिलेचा मृत्यू होऊन दुचाकी चालक जखमी झाला. सदरील अपघात गुरुवार, दि. १८ मे २०२३ रोजी सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघाताची फिर्याद महादेव रामा शिंदे (वय-५४) रा. निळज ता. माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.

सदर अपघाताबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, घटनेतील फिर्यादी महादेव रामा शिंदे यांचा मुलगा मुकेश व सून अरुणा असे कोलाड येथून घरगुती सामान घेऊन त्यांची मोटारसायकल क्र. एमएच ०६ बीएफ २६८३ या गाडीने घरी निळज येथे मुंबई-गोवा महामार्गाने येत असताना भुवन गावच्या थांब्याजवळ जोशी हॉटेलसमोर आल्यावर त्यांच्या गाडीला एका अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन मुंबई बाजूकडून गोवा बाजूकडे भरधाव वेगाने चालवून घेऊन जात असताना मोटारसायकलला धडक दिली. या अपघातात फिर्यादी यांची सून अरुणा मुकेश शिंदे (वय-३०) रा. निळज या महिलेचा मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा मोटारसायकल चालक मुकेश महादेव शिंदे (वय-३२) रा. निळज हा गंभीर जखमी होऊन दुचाकीचे नुकसान झाले. घटनास्थळावरून नंतर अज्ञात वाहनचालक पोलिसांना कोणतीही माहिती न देता पळून गेला. या अपघाताच्या गुन्ह्याची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात कॉ.गु.रजि.नं.१५४ /२०२३ भादंवि संहिता कलम ३०४ (अ), २७९, ३३७,३३८ मोटार वाहन कायदा अधी नियम १८४,१३४ प्रमाणे दाखल करण्यात आले आहे. सदर अपघाताच्या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक अस्मिता पाटील या करीत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!