बेलोशी सागवाडी येथील आदिवासी वाडीवरील विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप
अलिबाग : रोट्रॅक्ट क्लब ऑफ अलिबाग सिशोअर यांच्यावतीने बेलोशी सागवाडी येथील रोटरी क्लबने दत्तक घेतलेल्या आदिवासी वाडी येथील शालेय विद्यार्थ्यांना वही, पेन, पेन्सिल, खोडरबर व इतर शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे पाचवे वर्ष असून यापुढेही प्रतिवर्षी रोट्रॅक्ट क्लब ऑफ अलिबाग सिशोअर यांच्यावतीने हा उपक्रम राबवण्यात येईल अशी ग्वाही सर्व रोट्रॅक्ट सदस्यांनी विद्यार्थी व ग्रामस्थांना दिली.
या उपक्रमासाठी रोट्रॅक्ट क्लब ऑफ अलिबाग सिशोअरच्या सर्व सदस्यांनी आपल्या इच्छेप्रमाणे आर्थिक मदत जमा करून शालेय वस्तूंची खरेदी करून सागवाडी येथील गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आली. त्यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून सर्व सदस्यांना आपण केलेल्या छोट्याशा कार्याचा मोठ्या प्रमाणात आनंद व समाधान मिळाले.
या कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामस्थांनी तसेच आदिवासी समाजाचे अध्यक्ष जानु शीद व व सागवाडी येथील रोट्रॅक्ट सदस्य परम सोनार यांनी रोट्रॅक्ट क्लब ऑफ अलिबाग सिशोअरचे मनापासून आभार व्यक्त केले व यापुढेही असे अनेक उपक्रम आमच्या समाजाच्या लोकांपर्यंत आपल्या मार्फत पोहचतील अशी अपेक्षा व्यक्त केली.
या कार्यक्रमासाठी रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. निलेश पाटील व सदस्य, रोट्रॅक्ट क्लबचे अध्यक्ष ऋषिकेश पाटील, सचिव सृष्टी राणे, तेजस, संकेत, अनिकेत, विद्या, हर्ष, मनस्वी, प्रतीक, अवंती, परम यांनी खूप मेहनत घेतली.