• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

‘महाराज’ चित्रपटावरून गुजराती समाज आक्रमक, नेरळ पोलीस ठाण्यात दिले निवेदन

ByEditor

Jun 23, 2024

गणेश पवार
कर्जत :
नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफोर्मवर नुकताच ‘महाराज’ हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला आहे. १६० वर्षापूर्वी झालेल्या एका केसचा आधार घेत निर्माण पुस्तकाची प्रेरणा घेत हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. यामध्ये हिंदूचे आराध्य दैवत श्रीकृष्ण भगवान यांची अवहेलना करत श्रीकृष्ण व तत्कालीन धर्मगुरू यांच्याबाबत आक्षेपार्ह चित्रण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावरून गुजराती समाज आक्रमक झाला असून नेरळ पोलीस ठाणे येथे भेट देत हा चित्रपट प्रदर्शित करू नये अशी मागणी मोडासा एकडा दशा खड़ायता गुजराती समाज नेरळ यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

हिंदू धर्म हा जगात सर्वोत्तम समजला जातो. अनेक रूढी, परंपरा, विविधता, संस्कृती विनम्रता याने हिंदू धर्म नटलेला आहे. तर चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन नाही तर त्यातून समाजात एक संदेश जात असतो हे आपण कित्येकदा पाहिलं आहे. धर्मावरती भाष्य करणारे अनेक चित्रपट यागोदर देखील निर्माण झाले आहेत. मात्र, निर्माता व दिग्दर्शक हे आपला संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचवताना कुणाच्याही भावना दुखावणार नाही याची काळजी घेत असतात. ‘ओ माय गाॅड’, ‘ओ माय गाॅड २’, ‘गाॅड तुस्सी ग्रेट हो’ आदी चित्रपट हि त्यांची उदाहरणे आहेत. अशात आता ब्रिटीशकाळात १८६२ साली बॉम्बे प्रांतामध्ये एक न्यायालयीन खटला लढण्यात आला होता. तत्कालीन समाजसुधारक करसनदास मुळशी व महाराज यदुनाथ यांच्यामध्ये असलेल्या खटल्यावरून ‘महाराज’ या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली होती. तर या पुस्तकावरून नुकताच ‘महाराज’ हा यश राज फिल्म्सने सिनेमा तयार करून तो नेटफ्लिक्स ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला आहे. मात्र, यामध्ये भगवान श्रीकृष्ण व तत्कालीन धर्मगुरू यांच्याबाबत आक्षेपार्ह चित्रण दाखवण्यात आल्याचा आरोप गुजराती समाजाकडून करण्यात आला आहे. तर समाजाकडून नाराजी देखील व्यक्त करण्यात आली आहे.

भगवान श्रीकृष्णाचा परिवार हा केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगात पसरलेला आहे. या चित्रपटात भक्तपरिवारावर प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे. तेव्हा यावर योग्य ती कारवाई केली जावी अशी मागणी मोडासा एकडा दशा खड़ायता गुजराती समाज नेरळ यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन नेरळ पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे. यावेळी हा चित्रपट नेरळ शहरातील चित्रपटगृहात प्रदर्शित केला जाऊ नये अशा सूचना तात्काळ नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी चित्रपटगृह प्रशासनाला दिल्या.

यावेळी मुख्य तक्रारदार परेश मजेठिया, मोडासा एकडा दशा खड़ायता गुजराती समाज नेरळचे महेंद्र व्ही. शहा, कौशिक के. शहा, मयुर शहा, पिना शहा, रेणुका शहा, मनूभाई शहा, अतुल शहा, सोनल शहा, उशा शहा, दक्षा शहा, माधुरी शहा, संगीता शहा, ज्योती शहा, दीपल शहा व अरविंद शहा आदी उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!