• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

म्हसळा येथे भरधाव कारचा भीषण अपघात; 3 जणांचा जागीच मृत्यू

ByEditor

Jun 24, 2024

वार्ताहर
म्हसळा :
श्रीवर्धन-गोरेगाव मार्गावरील खामगाव आणि कणघर हद्दीत गोरेगाव येथून म्हसळा येथे जात असताना स्विफ्ट कार चालकाचा ताबा सुटल्याने अपघात होऊन तीन जण जागीच ठार तर एक जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सायंकाळी घडली. या अपघातातील मृतांत पाच वर्षांच्या लहान मुलाचाही समावेश असून सहा वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने म्हसळावासियांत एकच खळबळ उडाली आहे. या स्विफ्ट कार चालकाने गाडी प्रचंड वेगात चालविल्याने हा अपघात झाल्याचे म्हटले जात आहे.

वाहन क्रमांक एमएच 06 एएन 2223 स्विफ्ट कार चालक गोरेगावहून म्हसळ्याकडे येत असताना त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. या घटनेनंतर म्हसळा ग्रामीण रुग्णालयात जखमींना दाखल करण्यात आले. परंतू या अपघातात चालक मोहम्मद रफीक शेख अंदाजे ( वय 34, रा.म्हसळा ), कृष्णा हरिशचंद्र कांबळे (वय 45, रा. मेंदडी), मोहम्मद याचा मुलगा मुसा शेख (वय 5) हे जागीच ठार झाले. चालक मोहम्मद रफीक शेख यांचा मोठा मुलगा ईसा महमद शेख गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले आहे.

सायंकाळी पावणे पाच वाजताच्या सुमारास स्विफ्ट कारचा म्हसळा- कणघर येथे अपघात झाल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. तेव्हा ही कार म्हसळा येथील असल्याचे समजताच एकच हाहा:कार उडाला. अपघाताची माहिती मिळताच स्वयंसेवक, नागरिक आणि पोलीसांनी गाडीत अडकलेल्यांना बाहेर काढले. जखमीला म्हसळा ग्रामीण रुग्णालयात हलविले. घटनास्थळी अपघाताची तीव्रता पहाता गाडीचा वेग जास्त असल्याने गाडी चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला असावा असे म्हटले जात आहे. या अपघात प्रकरणात म्हसळा आणि गोरेगाव पोलिसांनी तातडीने मदतकार्य सुरू करून पंचनामा आणि तपास सुरु केला आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!