• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

कार्लेखिंड येथे वडखळकडे जाणाऱ्या बाजूला बसस्थानक उभारण्याची प्रवाशांची मागणी

ByEditor

Jun 26, 2024

अब्दुल सोगावकर
सोगाव :
अलिबाग वडखळ मार्गावर कार्लेखिंड येथे वडखळ बाजूला जाणाऱ्या प्रवाशांसाठी बसस्थानक उभारण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

अलिबाग वडखळ मार्गावरील कार्लेखिंड येथे वडखळ बाजूला जाताना एसटी बसचा महत्वाचा एसटी बस थांबा असल्याने याठिकाणी रेवस व मांडवा भागातील असंख्य गावातील रोज हजारोंच्या संख्येने प्रवाशी मुंबई, पुण्याकडे व इतर कोणत्याही ठिकाणी जाताना कार्लेखिंड येथील एसटी बस थांब्यावरूनच प्रवास करताना दिसतात.

मात्र, कार्लेखिंड याठिकाणी अलिबाग बाजूला जाणाऱ्या प्रवाशांसाठी बसस्थानकाची काही वर्षांपूर्वी नवीन इमारत उभी केली आहे, हि इमारत गलिच्छ असून या ठिकाणी अनधिकृतपणे दुचाकी उभ्या केलेल्या असतात, यामुळे प्रवाशांना या बसस्थानकाचा उपयोग करण्यात अडचण येत आहेत. शिवाय या बसस्थानकाचा वडखळ बाजूला जाणाऱ्या प्रवाशांना कोणताही फायदा होत नाही असे स्पष्ट दिसत आहे. पलीकडच्या बाजूला उभे राहून अलिबागकडून अचानक बस थांब्याजवळ आलेली बस पकडण्यासाठी रस्ता ओलांडून यावा लागतो, यावेळी प्रवाशांना आपल्या सामानसुमानासह व कुटुंब कबिल्यासह अचानक रस्ता ओलांडून येताना अपघात होण्याची शक्यता असल्याने परिणामी प्रवाशी पलीकडे न जाता याच बाजूला भर उन्हात तर कधी भर पावसात बसची वाट पाहत ताटकळत उभे असतात.

या एसटी थांब्यावरून दररोज शाळेतील विद्यार्थी, आजारी रुग्ण, वयोवृद्ध, लहान मुले यांच्यासह प्रवास करणारे प्रवाशी यांना नाईलाजास्तव भर उन्हात तर कधी भर पावसात बसची वाट बघत ताटकळत उभे रहावे लागत असल्याने त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे, शिवाय याठिकाणी बसण्याची तर सोडा निदान उभे राहण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने रस्त्यावरच उभे राहावे लागत असल्याने अपघाताचा धोका देखील जास्त आहे. याबाबत प्रशासनाविरोधात प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

यासाठी सरकारने व संबंधित प्रशासनाने याची दखल घेऊन कार्लेखिंड याठिकाणी वडखळ बाजूकडे जाणाऱ्या बस थांब्यावर बसस्थानक उभारण्याची प्रवाशांची मागणी जोर धरू लागली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!