महिला पदवीधरांनी बजावला मतदानाचा हक्क
विनायक पाटील
पेण : आज पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी मतदान झाले आहे. पेण तालुक्यातील जास्तीत जास्त महिला पदवीधर मतदारांनी मतदानाचा बजावला. यावेळी पदवीधर मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. मतदानासाठी त्यांनी सकाळपासूनच सार्वजनिक हायस्कूल पेण व गुरुकुल स्कूल येथे गर्दी केली असल्याचे चित्र दिसून येत होते. त्यामुळेच पेण तालुक्यातून ७२ टक्के मतदान झालेला पाहावयास मिळाला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात आजची महत्वाची निवडणूक होती. त्यामुळे यात कोणता पक्ष बाजी मरणार हे आज होणाऱ्या मतदानामुळे ठरणार आहे.
या निवडणुकीत एकूण ५५१३ मतदारांपैकी ३९८१ पदवीधर मतदारांनी मतदान करून आपला हक्क बजावला असून पेणमध्ये ७२ टक्के मतदान झाले. या निवडणुकीत महायुतीचे भाजप प्रणित उमेदवार निरंजन वसंत डावखरे आणि महाविकास आघाडीचे रमेश किर या उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. या निवडणुकीतही अनेक आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाले. आज १३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून या निवडणुकीत कोण बाजी मरणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
आज सकाळी ७ पासून मतदानाला सुरुवात झाली. आजच्या मतदानासाठी पदवीधरांना मतदान केंद्रांपर्यंत आणण्यासाठी उमेदवारांना मोठी कसरत करावी लागली. पदवीधर तसेच शिक्षक मतदारसंघांत नोंदणी केलेल्या मतदारांना मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी शासनाने विशेष सुट्टी मंजूर केली होती.