महामार्गावर भर पावसात झाड कोसळल्याने ६ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा
सलीम शेख
माणगाव : सकाळपासूनच माणगाव तालुक्याला अतिवृष्टीने झोडपले असून या भर पावसात ता. २८ जून रोजी शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता मुंबई–गोवा महामार्गावर अचानक वडाचे झाड कोसळल्याने महामार्गावर इंदापूर व माणगाव या दोन्ही बाजूंच्या दिशेने ६ कि.मी. च्या वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. हे उंबराचे झाड बाजूला काढण्यासाठी माणगाव पोलीस, वाहतूक पोलीस तसेच सार्वजनिक बांधकाम व नॅशनल हायवेच्या कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली.

मुंबई–गोवा महामार्गावर माणगावपासून इंदापूर बाजूकडे दीड किमी अंतरावर गणेश पॅलेस हॉटेलजवळ महामार्गालगत असणारे उंबराचे झाड अतिवृष्टीच्या पावसात कोसळून ते महामार्गावर पडले. दरम्यान, या महामार्गावरून त्यावेळी कोणतेही वाहन जात नसल्याने सुदैवाने पुढील अनर्थ टळला. मुंबई–गोवा महामार्ग सतत रहदारीचा असल्याने या मार्गावरून पर्यटक तसेच चाकरमानी, प्रवासी मोठ्या प्रमाणात कोकण व तळ कोकणात प्रवास करतात. त्यामुळे या मार्गावर सतत वाहतूक असते. या महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम गेली अनेक वर्ष सुरु असून रुंदीकरणामुळे रस्त्याच्या कडेला असणारे जुनी वृक्ष मोठ्या प्रमाणात आहेत. या वृक्षामुळे या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढत आहे. त्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याने डोळेझाक चालवली आहे.
महामार्गालगत असणारी धोकादायक जुनी वृक्ष काढून टाकावीत अशी प्रवासी, पर्यटक, नागरिकांची मागणी आहे. सायंकाळी ४.०० वाजता महामार्गावर हे झाड कोसळल्याने दोनही बाजूंनी ६ किमी अंतरावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. महामार्गावर झाड कोसळल्याची माहिती माणगाव वाहतूक पोलीस व पोलीस ठाणे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाला समजताच संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी एकच धाव घेतली. हे झाड बाजूला करण्यासाठी कटर, जेसीबी, मशीन, दोन मागविण्यात आल्या. आणि तब्बल दीड ते पावणेदोन तासानंतर हे झाड बाजूला करून वाहतूक सुरळीत सुरु करण्यात यश आले. मात्र मुंबई – गोवा महामार्गावर दोनही बाजूनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती.