संतोष ठाकूर व विजय भोईर यांच्या प्रयत्नांना यश
अनंत नारंगीकर
उरण : महावितरणच्या दुर्लक्षामुळे उरणच्या पुर्व विभागात विजेचा सातत्याने खेळ खंडोबा सुरू असतो. रात्री अपरात्री, कधी कधी दिवसभर या भागात वीज खंडीत होते. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. या त्रासातून पुर्व भागातील जनतेची सुटका होण्यासाठी शिवसेनेचे तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, माजी जि. प. सदस्य विजय भोईर यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यांच्या पाठपुराव्यामुळे दिघोडे येथे नवीन सबस्टेशन होणार असून याकरिता शासनातर्फे महावितरणला जी जागा देण्यात येणार आहे त्याचे डिपॉझिट शासनाकडे महावितरणने नुकतेच भरणा केले आहे.

केंद्र शासन पुरस्कृत आरडीएसएस योजने अंतर्गत प्रस्तावित असलेल्या नवीन उपकेंद्र उभारण्याकरीता मौजे दिघोडे येथिल स. नं. १६६/ ६ क या शासकीय जमिनीपैकी १० गुंठे जमिन हस्तांतरीत करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच येथे महावितरणकडून वीज केंद्राचे काम सुरू होवून उरण पूर्व भागातील वीजेची समस्या दुर होईल. दिघोडे येथे उपकेंद्र होण्यासाठी माजी जि. प. सदस्य तथा शिवसेना (उबाठा) तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, माजी जि. प. सदस्य विजय भोईर यांनी तसेच माजी जि. प. सदस्य डॉ. मनिष पाटील, वैजनाथ ठाकूर यांनी आजी-माजी आमदार, खासदार यांच्या माध्यमातून राज्याच्या मंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्यामुळेच हे उपकेंद्र मंजूर होण्यापासून ते जागा मिळणे आदी बाबी मार्गी लागल्या आहेत.
उरण पूर्व भागात येणारी वीज ही सुमारे ७० ते ७५ किलोमिटर लांबीवर असलेल्या फिडरवरून आणली जाते. त्यातही संपूर्ण वीजलाईन ही खाडी किनाऱ्यावरून तसेच रस्त्यांच्या कडे-कडेने आलेली आहे. या वीज वाहिन्या तुटल्या जातात, त्यामुळे वीज पुरवठा रात्री अपरात्री वारंवार खंडीत होतो. त्यातच उरण तालुक्यात मागील काही वर्षात वीजेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. प्रचंड वेगाने वाढणारे औद्योगिकीकरण, शहरीकरण यामुळे वीजेची मागणी वाढली आहे. तालुक्यात सुमारे ७० हजार वीज ग्राहक आहेत. यामध्ये ७०० ते ८०० हे व्यावसायिक प्रकारचे ग्राहक आहेत. तालुक्यात सुमारे ५०० च्या जवळपास ट्रान्सफार्मर आहेत. उरण पुर्व भागात सुमारे ७० ते ७५ किलोमीटर लांबून वीज आणावी लागते. त्यामुळे येथपर्यंत येताना वीज वाहिनीमध्ये काहीतरी समस्या येवून रोज वीज खंडीत होते. यासाठी हे अंतर कमी करणे गरजेचे आहे. यासाठी उरण पुर्व भागात सबस्टेशन आणि फिडर उभारणे गरजेचे होते. उरण पुर्व विभागातील विज समस्या कायमची सोडवण्यासाठी शासनाने महावितरण कंपनीच्या माध्यमातून प्रयत्न सुरू झाल्याने शिवसेनेचे तालुकाप्रमुख संतोष ठाकूर व विजय भोईर यांनी आभार व्यक्त केले आहेत.
उरण पुर्व भागासाठी दिघोडे येथे १० गुंठे जागा मिळाली असून त्याचे शासनाकडे डिपॉझिट भरले आहे. लवकरच या कामाचे टेंडर होवून सबस्टेशनच्या कामाला सुरूवात करण्यात येणार आहे.
-विजय सोनवणे
अति. कार्यकारी अभियंता, महावितरण उरण.