भरडखोल कोळी समाजाची 39 वर्षाची अखंडित परंपरा
अभय पाटील
बोर्ली पंचतन : श्रीवर्धन तालुक्यातील श्री क्षेत्र भरडखोल येथून आज म्हणजे ज्येष्ठ वद्य अष्टमी शनिवार, दि. 29 जून रोजी सकाळी 7 च्या सुमारास पायी वारकऱ्यांच्या दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. 39 वर्षाची अखंडित परंपर असलेल्या ह्या वारीत सुमारे 100 वारकरी सहभागी झाले आहेत.

श्रीवर्धन तालुक्यातील भरडखोल हे गाव म्हणजे मासेमारी व्यवसाय असणाऱ्या कोळी समाजाच्या लोकवस्तीचे. भरडखोल गाव हे मच्छिमारी व मासळी बाजार यासाठी सर्वदूर प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे या गावातील बहुतांश लोक भक्ती मार्गाकडे असलेले माळकरी लोक असून दरवर्षी या गावातून आषाढी एकादशीसाठी शेकडो भक्त पायीवारी दिंडीमध्ये सहभागी होऊन विठुरायाच्या दर्शनासाठी जात असतात. दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या वद्य अष्टमीच्या दिवशी या वारीचे प्रस्थान भरडखोल येथून होत असते. आज शनिवार, दि. 29 जून रोजी या वारकरी दिंडीचे प्रस्थान सकाळी 7 च्या सुमारास झाले. पुढे आठव्या मुक्कामी ही वारी लोणंद या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली पालखीमध्ये सहभागी होऊन पुढे पंढरपूरकडे रवाना होईल.