• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

थळ येथील समुद्रकिनारी खडकात अडकून जखमी झालेल्या समुद्री कासवाला जीवदान

ByEditor

Jun 29, 2024

यशस्वी उपचार केल्यानंतर वन्यजीव रक्षक राम राऊत आणि मित्रपरिवाराने कासवाला सोडले समुद्रात

अब्दुल सोगावकर
सोगाव :
थळ येथे समुद्रकिनारी खडकात अडकून जखमी झालेल्या समुद्री कासवाला वन्यजीव रक्षक राम राऊत यांनी बाहेर काढून यशस्वी उपचारानंतर सुरक्षितरित्या समुद्रात सोडून देत जीवदान दिले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, अलिबाग तालुक्यातील थळ येथील गुंजाळ आळी जवळ शुक्रवार दि. २८ रोजी संध्याकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास समुद्रात आलेल्या भरतीच्या प्रवाहात वाहत आलेला एक मोठा समुद्री कासव समुद्रकिनारी खडकात जखमी अवस्थेत अडकून पडले असल्याचे ग्रामस्थांना दिसून आले. या कासवाला थळ येथील वन्यजीव रक्षक राम राऊत आणि त्यांच्या मित्रपरिवाराने खडकातुन काढले असता ते जखमी झाले असल्याचे दिसून आले, यामुळे त्यांनी वेळ दवडता अलिबाग येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दाभोळकर यांना माहिती देत त्यांना बोलावून उपचार करून घेतले. यानंतर काहीशा विश्रांतीनंतर त्या कासवाला समुद्रात सुरक्षित सोडून देण्यात आले. यावेळी वन्यजीव रक्षक राम राऊत यांच्या सोबत आदिती मॅडम, डॉ. दाभोळकर, ग्रामस्थ योगिता गुंजाळ, जईन कुलपे, भरत राऊत, राधिका राऊत, वैभवी म्हात्रे, वेदांत गुंजाळ, मोहक गुंजाळ, वैष्णवी म्हात्रे, मयंक म्हात्रे आदी उपस्थित होते.

यातील प्राणीमित्र राम राऊत यांनी कासवाला वाचविण्यासाठी महत्वाची भूमिका निभावली. राम राऊत हे थळ आरसीएफ कारखान्यात अग्निशमन दलात सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तसेच ते एक पक्के निसर्गप्रेमी असल्याने ते सर्पमित्र म्हणून पंचक्रोशीत ओळखले जातात. त्यांनी आजपर्यंत थळ पंचक्रोशीत अनेक सापांना सुरक्षितरित्या पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून दिले आहे. तसेच यापूर्वी त्यांनी समुद्री कासवांची अंडी, पिल्ले व इतर वन्यजीवांचे संवर्धन केले आहे. सर्पमित्र राम राऊत यांनी थळ पंचक्रोशीतील नागरिकांना आवाहन केले आहे की, आपल्या परिसरात सर्प आल्यास त्याला मारू नये, ते निसर्गाचा समतोल राखण्यासाठी प्रमुख घटक आहेत. आम्ही त्या सर्पाला पकडून सुरक्षित ठिकाणी सोडून देऊ. यासाठी पुढील नंबरवर ९०४९६५५३३९ संपर्क साधावा, असे त्यांनी सांगितले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!