गणेश पवार
कर्जत : गेल्या वीस वर्षांपासून कर्जत तालुक्यातील देशव्यापी स्तरावर कार्यरत असलेल्या लाईट ऑफ लाइफ या संस्थेच्या माध्यमातून नारायण फेणाणी पब्लिक वेल्फेअर ट्रस्ट संचालित नेरळ विद्याभवन धामोते या शासनमान्य अनुदानित शाळेतील इयत्ता आठवी ते दहावीच्या १७० शालेय विद्यार्थ्यांना ‘आनंदो शाळांचे सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत’ दप्तरांसह एक डझन रजिस्टर वही, चित्रकला, आलेख वही, कॅम्लिन कंपासपेटी, रंगपेटी या शैक्षणिक साहित्याचे वाटप HDFC Credila शैक्षणिक कर्ज व्यवस्थापन समूहाच्या सीएसआर निधीतून व्यवस्थापक नंदिनी राज यांच्या समन्वयातून करण्यात आले.

याप्रसंगी विचारमंचावर शाळेच्या मुख्याध्यापिका अनघा जोगळेकर, लाईट ऑफ लाइफ संस्थेच्या आनंदो शाळा प्रकल्पाच्या व्यवस्थापक कांचन थोरवे, शाळा समन्वयक शिल्पा रांगणेकर, नोडल टिचर सुशिला केळकर, अंकिता आंबोणकर, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष रविंद्र धुळे, सदस्य निवृत्ती खाडे, सदस्या आशा गवळी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सेवाज्येष्ठ सहाय्यक शिक्षक संतोष कांबरी सर यांनी केले आणि आभार प्रदर्शन सचिन अभंगे यांनी केले.

या कार्यक्रमात आठवी ते दहावीच्या १७० विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांसमवेत मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढ आणि विकासासाठी लाईट ऑफ लाइफ ट्रस्ट पुढील तीन वर्षे नेरळ विद्याभवन सोबत कार्य करणार आहे. या शैक्षणिक साहित्याचे वाटपातून अनेक आदिवासी बहुल ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना लाभ होईल असा विश्वास HDFC Credila व्यवस्थापक नंदिनी राज यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात कांचन थोरवे यांनी मुलांच्या भविष्यासाठी आजच्या स्पर्धेच्या युगात सर्वोत्तम गुंतवणूक म्हणून शिक्षण व्यवस्थेत तन मन धन अर्पण करून समर्पित भावनेने पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे असे सांगितले. सदर शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नामदेव ढवळे, मंगेश थोरवे, पुष्पा सोनवणे, संजय चव्हाण, एकनाथ बुरूड, विद्या वाळिंबे, पंचशिला जाधव, विकास पाटील, महेश अभंगे, इंदिराबाई पेरणे यांनी विशेष परिश्रम घेतले.