किरण लाड
नागोठणे : येथील कु. साक्षी दिपक वाडेकर हिची सिंगापूर येथील अेजी मेरिटाईम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये महिला सेलर या पदावर निवड झाली आहे. सिंगापूर ते शांघाय चीन असा कंपनीच्या जहाजाचा प्रवास असेल. तिच्या या निवडीने नागोठणे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
नागोठणे येथील केएमजी विभाग कुंभारआळीतील दिपक वाडेकर व प्रतिभा वाडेकर यांची कन्या कु. साक्षी पहिल्यापासून धाडसी तसेच अभ्यासात हुशार, आव्हान पेलण्याची सवय नसनसात भिनली गेली असल्याने महिला म्हणुन काहीतरी वेगळे करायचे हा पहिल्यापासुन तीचा अट्टहास. टु व्हिलर चालविणे, शालेय सुट्टीमध्ये वडीलांच्या गणपती कारखान्यात कामात हातभार लावणे, पुरुषासारखी काम करणे तिला आवडत असे.
साक्षी हिने १०वी पर्यंत शिक्षण होली एंजल स्कुल नागोठणे येथे घेतल्यानंतर १२वीचे शिक्षण रिलायन्स फाउंडेशन स्कुलमध्ये घेतले. तिची साहसी वृत्ती तिला गप्प बसुन देत नव्हती. वडीलांना आग्रह करुन मला नेव्हीमध्ये काम करायचे आहे हा तीचा अट्टहास पुर्ण झाला. साक्षीने चेन्नई येथील साऊथम अकॅडमी ऑफ मेरी स्टडीज, मर्चंट नेव्ही येथे प्रवेश घेऊन डिप्लोमा इन नॅाटीकल सायन्स ही तिन वर्षाची पदवी चांगल्या गुणांनी पास झाली आणि जहाज चालविणे ही पुरुषाची मक्तेदारी मोडीत काढली. अथांग समुद्रामध्ये जहाज चालविणे हे तिचे स्वप्न पुर्ण झाले होते. सिंगापूर ते शाघांय चीन असा जहाजावरील प्रवास सुरु करण्यासाठी साक्षी १० जुलै रोजी तिच्या नोकरीवर हजर होण्यासाठी सिंगापूरला रवाना झाली आहे. तिच्या या यशाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.