माणगाव सत्र न्यायाधीश यांचा महत्वपूर्ण निर्णय
कोलाड पोलिस स्टेशनच्या हद्दीतील डोलवहाळ येथील घटना
सलीम शेख
माणगाव : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीस ५ वर्ष सक्तमजूरीची शिक्षा दिल्याचा महत्वपूर्ण निर्णय माणगाव सत्र न्यायाधीश यांनी दिला आहे. सदरची घटना कोलाड पोलिस स्टेशनच्या हद्दीतील मौजे डोलवहाळ गावचे हद्दीत गावदेवी मंदिराजवळ दि. ८ जानेवारी २०२१ रोजी घडली होती.
सदर घटनेची थोडक्यात हकीकत अशी की, पिडीत अल्पवयीन मुलगी व आरोपीत हे एकाच गावातील राहणारे असून पिडीत अल्पवयीन मुलगी ही तिचे मैत्रिणीसोबत खेळत असतांना यांतील आरोपीत याने पिडीत अल्पवयीन मुलगी हिस पाठिमागून दोन्ही हाताने घट्ट मिठी मारून अल्पवयीन मुलगी हिचे स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याबाबत कोलाड पोलिस ठाणे येथे सदर घटनेची फिर्याद पोलिसांनी घेतली होती. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. ए. जाधव कोलाड पोलिस ठाणे यांनी केला व आरोपींविरूध्द् न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. सदर खटल्याची सुनावणी मा. अति. सह जिल्हा व सत्र न्यायाधीश, माणगाव-रायगड येथे झाली व सदर गुन्ह्यात पिडीत मुलगी व तिच्या मैत्रीणीची साक्ष महत्वाचा पुरावा ठरला. सदर खटल्यामध्ये अति. शासकिय अभियोक्ता जितेंद्र म्हात्रे यांनी सरकार पक्षाच्या वतीने काम पाहिले व साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली आहे. कोर्टासमोर प्रभावीपणे युक्तिवाद करून महत्वाचे न्यायनिर्णय दाखल केले.
सदर केसच्या सुनावणी दरम्यान पैरवी अधिकारी पो. स. ई. दिनेश आघाव, पो. ह. शशिकांत कासार, शशिकांत गोविलकर, छाया कोपनर, सोमनाथ ढाकणे यांनी सहकार्य केले. मा. विशेष व सत्र न्यायाधीश यु. टी. पोळ यांनी सदर घटनेतील गुन्ह्याच्या शाबीतीनंतर आरोपींना दोषी ठरवून दि. ९ जुलै रोजी आरोपींला पोक्सो कलम ८ अन्वये ३ वर्ष सक्तमजूरी व रू. ५००/- दंड व दंड न भरल्यास ३ महिने साधा कारावास व पोक्सो कलम १० अन्वये ५ वर्ष सक्तमजूरी व रू. ५००/- दंड व दंड न भरल्यास ६ महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.