• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खडीने भरले जातात जीवघेणे खड्डे!

ByEditor

Jul 10, 2024

मिलिंद माने
महाड :
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर महाडपासून माणगावपर्यंत रस्त्यावर पडलेले खड्डे खडीने भरण्याची अनोखी मोहीम चालू असून या जीवघेण्या खड्ड्यांमुळे पुन्हा एकदा अपघात होऊन प्रवाशांचे नाहक बळी जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महाडपासून दासगाव खिंडीनंतर वीर स्टेशनच्या पुढे लाखपाले, टेमपाले, लोणेरा फाटा या परिसरात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून रात्रीच्या वेळेस हे खड्डे पावसामुळे पुन्हा जैसे थे होत असल्याने खड्ड्यांचा अंदाज वाहन चालकांना येत नसल्याने खड्ड्यामध्ये वाहने आदळून अनेक वाहने बंद पडल्याची उदाहरणे दररोज पाहावयास मिळत आहेत. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लाखपाले, टेमपाले व लोणेरे येथे आज पाऊस नसल्याने खड्डे भरण्याची मोहीम चालू होती, मात्र खड्डे भरत असताना डंपरमधून खडीमिश्रित माती खड्डे पडलेल्या रस्त्यावर ढकलून खड्डे भरण्याची अनोखी मोहीम चालू असल्याचे चित्र पाहावयास मिळत होते.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग हा राष्ट्रीय महामार्ग असताना या ठिकाणी पडलेले खड्डे डांबरमिश्रित खडीच्या साहाय्याने भरणे आवश्यक असताना या ठिकाणी पडलेले खड्डे केवळ खडीमिश्रित माती टाकून भरण्याचे काम करून केवळ सोपस्कार पार पाडण्याचे उद्योग राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अधिकाऱ्यांच्या वरदहस्तामुळे ठेकेदार कंपनी करीत असल्याचे चित्र राष्ट्रीय महामार्गावर पाहावयास मिळत होते. याबाबत राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अधिकारी अथवा संबंधित कंपनीचे ठेकेदार अथवा त्यांचे प्रतिनिधी देखील हजर नसल्याने डंपरमधून मातीमिश्रित खडी रस्त्यावरील खड्डयांवर टाकून खड्डे भरण्याचे काम मजूर करीत होते. वास्तविक डांबरमिश्रित खडीने खड्डे भरून त्यावरती रोलिंग करून खड्डे भरण्याची प्रक्रिया असताना या सर्वांना फाटा देत राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे भरण्याची अनोखी मोहीम चालू असल्याने महामार्गावरील खड्डे प्रवाशांच्या जीवावर बेतण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!