मिलिंद माने
महाड : छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर रविवारी ७ जुलै रोजी झालेल्या ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणावर पर्यटक किल्ल्यावरून आलेल्या पाण्याच्या प्रवाहात अडकल्याने व दोन दिवस मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने पायरी मार्ग 31 जुलै पर्यंत बंद ठेवला आहे तर रोप वे देखील दोन दिवसासाठी बंद करण्यात आला होता. मात्र 11 जुलैपासून रायगड रोप वे पुन्हा सुरु झाल्याचे रायगड रोप वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.
किल्ले रायगडावर ७ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे व ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रवाह पायरी मार्गाने आल्याने व पाण्याचे धबधबे मोठ्या प्रमाणात किल्ल्यावर वाहत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले होते, त्यामुळे किल्ले रायगडावर पायरी मार्गाने जाणाऱ्या पर्यटकांना कोणतीही दुखापत होऊ नये यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाने 31 जुलैपर्यंत पायरी मार्ग बंद ठेवला आहे. तर पर्यटक रोप वे ने जाऊन मोठ्या प्रमाणावर किल्ल्यावर पर्जन्यवृष्टी झाली तर आपत्कालीन परिस्थितीत कोणतीही घटना घडू नये यासाठी रायगड रोप वे देखील दोन दिवसासाठी बंद ठेवण्यात आला होता. मात्र 11 जुलैपासून पुन्हा रायगड रोप वे चालू करण्यात आल्याचे रायगड रोप वे तर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
किल्ले रायगडावर सुट्टीच्या दिवशी रविवारी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. या पर्यटकांच्या माध्यमातून किल्ले रायगड परिसरात असणाऱ्या स्थानिक बेरोजगार तरुणांना व व्यावसायिकांना त्याचा फायदा होतो. जर पर्यटक बंद झाले तर रायगडावरील बेरोजगार तरुणांना उपासमारीची वेळ येऊ शकते. यासाठी प्रशासनाने रायगड पाहण्यासाठी येणाऱ्या तरुणांसाठी व पर्यटकांसाठी आपत्कालीन परिस्थितीमध्ये तशी परिस्थिती उद्भवू नये व उद्भवल्यास त्यावर उपाययोजना करता याव्यात यासाठी निश्चित आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी पावसाळ्यात झाली तरच रायगडसारख्या किल्ल्याच्या माध्यमातून पर्यटक वाढून पर्यटनाला चालना मिळू शकेल. मात्र विकासाच्या नावाखाली केवळ रस्ते व संरक्षण भिंती बांधून व राज्याभिषेक सोहळा साजरा करून पर्यटकांच्या संख्येत वाढ होणार नाही, तर पर्यटन धोरणाच्या आराखड्यानुसार स्थानिकांना विश्वासात घेऊनच पर्यटन आराखडा राबविला तरच रायगड किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढेल व स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल. त्यासाठी गरज आहे ती समन्वयाची. मात्र, त्यात देखील राजकारण येत असल्याने रायगड किल्ल्यावरील पर्यटनाच्या दृष्टिकोनातूनच त्याची अंमलबजावणी व धोरणाकडे व पर्यटकांना मूलभूत सोयी सुविधा पुरवणे गरजेचे असल्याचे अनेक पर्यटकांनी सांगितले.