अनंत नारंगीकर
उरण : उरण एसटी बस आगार व्यवस्थापकांनी द्रोणागिरी नोड-भेंडखळ मार्गे एसटीची बस सेवा बंद केल्याने प्रवाशी नागरिकांची गैरसोय निर्माण होत आहे. तरी बंद करण्यात आलेली बस सेवा द्रोणागिरी नोड – भेंडखळ मार्गे पूर्ववत सुरू करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) उरण तालुका उपाध्यक्ष तथा उरण तालुका मागासवर्गीय सामाजिक विकास संस्थेचे उपाध्यक्ष शिवाजी ठाकूर यांनी केली आहे.
उरण बस आगार व्यवस्थापकांनी द्रोणागिरी नोड, बीपीसीएल्, भेंडखळ, बामर लारी, नवघर मार्गे सुरू असणारी एसटीची बस सेवा बंद केल्याने या परिसरातील तसेच उरण पुर्व विभागातील प्रवाशी नागरीकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे बंद केलेली बस सेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी उरण तालूका आरपीआय उपाध्यक्ष शिवाजी ठाकूर यांनी भेंडखळ गावातील ज्येष्ठ नागरिक भानूदास भगत, रायगड भूषण नरेश ठाकूर, वसंत भगत, भगवान भगत आणि अभिजीत ठाकूर ग्रामपंचायत सदस्य भेंडखळ ग्रामपंचायत यांना सोबत घेवून उरण बस आगार व्यवस्थापक अनिल दराडे यांना निवेदन दिले आणि बस सेवा सुरु करण्याची मागणी केली. तेव्हा त्यांनी सांगितले कि, पूर्वी ३ बस चालू होत्या आणि आजपासून ६ बस चालू केल्या आहेत आणि २१ जुलैनंतर आणखी बस फेरीत वाढ केली जाणार असल्याचे आश्वासन दिले आहे.