माणगाव तालुक्यातील गोरेगाव-मोर्बा मार्गावर वडवली गावाच्या हद्दीत भरधाव टेम्पोने दिलेल्या धडकेत ५२ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवार, १ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. घरातील कचरा रस्त्यापलीकडे टाकून घरी परतत असताना भरधाव टेम्पोने महिलेला चिरडले.
फरफटत नेल्याने गंभीर इजा कैसर जुल्फिकार येलूकर (वय ५२, रा. वडवली, ता. माणगाव) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या रविवारी सकाळी साडेनाऊच्या सुमारास घरातील कचरा रस्त्यापलीकडे टाकून घराकडे परतत होत्या. यावेळी गोरेगाव बाजूकडून मोर्बाकडे जाणाऱ्या टेम्पोने (क्रमांक: MH 04 FU 5391) त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, टेम्पोने त्यांना काही अंतरापर्यंत फरफटत नेले, ज्यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. उपजिल्हा रुग्णालयात हलवले, मात्र... अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. शिवसेना नेते शरीफ हारगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष सज्जादभाई डावरे, वडवलीचे सरपंच मधर डावरे, गोरेगावचे सरपंच जुबेर अब्बासी, असद फकी यांच्यासह ग्रामस्थ तात्काळ मदतीला धावले. घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. गंभीर जखमी कैसर येलूकर यांना तात्काळ माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे घोषित करण्यात आले. याप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर या दुर्दैवी घटनेमुळे वडवली गावासह परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे. गावांच्या हद्दीतून जाणाऱ्या मार्गांवर वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.टेम्पोच्या धडकेत ५२ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू; गोरेगाव-मोर्बा मार्गावर भीषण अपघात