रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे मुंबई-गोवा महामार्गालगत सुरू असलेल्या एका बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर माणगाव पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, रोख रक्कम, मोबाईल, जुगाराचे साहित्य आणि वाहनांसह सुमारे २० लाख ७० हजार ६९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील मौजे ढालघर गावच्या हद्दीत, हॉटेल कार्तिकसमोर असलेल्या नारायण गंगाराम शेठ यांच्या इमारतीत काही जण आर्थिक फायद्यासाठी पत्त्यांचा डाव मांडून 'तीन पत्ती' हा जुगार खेळत असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे २ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी सदर ठिकाणी अचानक छापा टाकला. या धडक कारवाईत पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या आणि चालवणाऱ्या एकूण २५ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळावरून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, मोबाईल फोन तसेच जुगारी व संशयितांची वाहने असा एकूण २० लाख ७० हजार ६९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही धडक कारवाई रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक मारुती आंधळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पार पाडली. या कारवाईमुळे माणगाव व परिसरातील जुगार चालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.माणगावमध्ये बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; २५ जणांवर गुन्हा दाखल, २० लाखांचा मुद्देमाल जप्त