रोहा येथील भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. हा पक्षप्रवेश केवळ पक्षांतर नसून रायगडच्या राजकारणात नव्या संघर्षाची नांदी ठरेल, असा थेट इशारा मंत्री भरतशेठ गोगावले यांनी विरोधकांना दिला.
रोह्यात शिवसेनेचे मोठे शक्तिप्रदर्शन; राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते व शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश
धाटाव (शशिकांत मोरे) | दि. १७ नोव्हेंबर
"रोह्यातील हा पक्षप्रवेश केवळ पक्षांतर नसून रायगडच्या राजकारणात नव्या राजकीय संघर्षाची नांदी ठरणार आहे. आम्ही आजवर कोणतीही निवडणूक हरलेलो नाही; माणसाची नियत आणि नीतिमत्ता चांगली असेल तर त्याचा कोणी पराभव करू शकत नाही. यापुढे रायगडमध्ये भगवे वादळ घोंगावणार आहे," असे प्रतिपादन राज्याचे मंत्री भरतशेठ गोगावले यांनी रोहा येथील पक्षप्रवेश सोहळ्यात केले.
जाहिरात (Advertisement)
सोमवार, दि. १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता रोहा येथील ऐतिहासिक राम मारुती चौकात शिवसेनेच्या वतीने भव्य पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे पेण विधानसभा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते प्रमोद म्हसकर, रोहा पंचायत समितीचे सदस्य सुरेश मगर, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप (आप्पा) देशमुख आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बी. डी. पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते शाल देऊन त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले.
विकास कामांवरून गोगावलेंची टीका
आपल्या भाषणात मंत्री भरत गोगावले यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. "महायुतीच्या सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी असताना मी दीड वर्ष त्याग केला. आम्ही बोलतो ते करतो म्हणून लोक आमच्या पाठीशी उभे राहतात. सभेला जमलेला हा प्रचंड जनसागर पाहून विरोधकांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे," असे गोगावले म्हणाले. प्रवेश केलेल्या सर्व नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाहीदेखील त्यांनी यावेळी दिली.
आमदार महेंद्र दळवी व विकास गोगावले यांचा इशारा
यावेळी आमदार महेंद्र दळवी यांनी रोहा नगरपालिकेच्या मागील निवडणुकीचा संदर्भ देत, "आता 'रोहा बोलतोय'" असे सांगत आगामी काळात संपूर्ण जिल्ह्यात शिवसेना मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला. तर युवा नेते विकास गोगावले यांनी जिल्ह्यात सलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पक्षप्रवेशाचा उल्लेख करत, "पक्षाला क्रमांक एकवर नेण्यासाठी कार्यकर्त्यांना ताकद दिली जाईल. आगामी काळात श्रीवर्धनचा आमदार आणि रायगडचा खासदारही शिवसेनेचाच असेल," असा विश्वास व्यक्त केला.
प्रवेशकर्त्यांनी व्यक्त केली नाराजी
पक्षात प्रवेश करण्यापूर्वी प्रमोद म्हसकर, सुरेश मगर आणि बी. डी. पाटील यांनी आपल्या पूर्वीच्या पक्षातील कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. "रोह्याच्या औद्योगिक वसाहतीत गेल्या ४० वर्षांत नवीन कारखाने न आल्याने रोजगाराचा प्रश्न गंभीर झाला आहे, तसेच शेतीसाठी पाण्याचे नियोजन नाही. हे प्रश्न सोडवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही शिवसेनेत प्रवेश करत आहोत," असे प्रमोद म्हसकर यांनी सांगितले. सुरेश मगर आणि बी. डी. पाटील यांनीही पूर्वीच्या पक्षात आश्वासने पाळली गेली नसल्याचा आरोप करत पेण आणि रोहा परिसरात शिवसेना बळकट करण्याची ग्वाही दिली. याप्रसंगी विजयराज खुळे आणि जितेश मुंढे यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमाला प्रमोद घोसाळकर, अनिल नवगणे, ज्ञानदेव पवार, संतोष पोटफोडे, उदेश वाडकर, अमित उकडे, संदेश मोरे, अशोक धोत्रे, माजी उपनगराध्यक्षा शिल्पा धोत्रे, पूजा पोटफोडे यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, युवा सेना कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या प्रभावक्षेत्रात झालेल्या या पक्षप्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे असून, यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.