उरणमधील वहाळ गावात हातचलाखी करून एका ८१ वर्षीय वृद्धाची सव्वा लाखांहून अधिक किमतीची सोन्याची चैन आणि अंगठी लांबवल्याची घटना घडली असून, याप्रकरणी उलवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उरण (अनंत नारंगीकर)
उरण तालुक्यातील वहाळ गावात हातचलाखी करून एका ८१ वर्षीय वृद्ध नागरिकाची सव्वा लाखांहून अधिक किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. सोन्याची चैन आणि अंगठी कागदाच्या पुडीत बदलत चोराने ही हातफेरी केली असून, याप्रकरणी उलवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जाहिरात (Advertisement)
नारायण माया घरत (वय ८१, रा. वहाळ गाव) असे फसवणूक झालेल्या वृद्ध नागरिकाचे नाव असून, ते उलवे सेक्टर २३ मध्ये तांदळाच्या भाकरी विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. १६ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ते वहाळ गावातील स्व. बाळकृष्ण काशीनाथ घरत प्रवेशद्वाराच्या कमानीजवळ बसले असताना ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक ४० ते ४५ वयाचा अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आला आणि त्यांना बाजूला घेऊन गेला. त्याने वृद्धाकडे गळ्यातील सोन्याची चैन आणि हातातील अंगठी पाहण्याच्या बहाण्याने मागितली. भोळ्याभाबड्या नारायण घरत यांनी आपले दागिने त्या इसमाच्या हातात दिले. चोराने ती चैन व अंगठी एका कागदात ठेवून हातचलाखीने दुसरी बनावट पुडी त्यांच्या हातात थडकवली.
वृद्ध घरी परतल्यानंतर त्यांनी घरातील सुनेला पुडी दाखवली. त्यावेळी कागद उघडून पाहिले असता त्यामध्ये सोन्याऐवजी बनावट चैन असल्याचे निष्पन्न झाले, तसेच हातातील अंगठीही गायब होती. चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये १ लाख २८ हजार रुपये किमतीची १०.३५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन आणि ६० हजार रुपये किमतीची ५ ग्रॅम वजनाची अंगठी असा एकूण १ लाख ८८ हजार रुपयांचा ऐवज आहे.
या प्रकरणी उलवा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम ३१६(२) नुसार अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, पोलीस निरीक्षक अजित सदाशिव कणसे पुढील तपास करत आहेत.