दिवेआगर ग्रामपंचायतीचे सरपंच विजय तोडणकर यांच्यावर निवडणूक प्रतिज्ञापत्रात संपत्ती लपवल्याप्रकरणी श्रीवर्धन तहसील कार्यालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. माणगाव हद्दीतील फ्लॅटची माहिती लपवल्याने रायगडच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
श्रीवर्धन (संदेश घोलप)
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती देणे किंवा संपत्ती लपवणे किती महागात पडू शकते, याचे ज्वलंत उदाहरण समोर आले आहे. श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर ग्रामपंचायतीचे विद्यमान थेट लोकनियुक्त सरपंच विजय सुदाम तोडणकर यांच्याविरुद्ध निवडणूक प्रतिज्ञापत्रात संपत्तीची माहिती जाणीवपूर्वक लपवल्याप्रकरणी प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे. श्रीवर्धन तहसील कार्यालयाने भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलमांनुसार त्यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल करण्याचे थेट आदेश दिले असून, या धडक कारवाईमुळे रायगडच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
जाहिरात (Advertisement)
काय आहे नेमके प्रकरण?
एप्रिल २०२६ मध्ये पार पडलेल्या दिवेआगर ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत विजय सुदाम तोडणकर थेट जनतेमधून सरपंचपदी निर्वाचित झाले होते. मात्र, त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना जोडलेल्या कायदेशीर प्रतिज्ञापत्रात आपल्या मालकीची स्थावर मालमत्ता लपवून ठेवल्याचा गंभीर आक्षेप दिवेआगरमधील नागरिक सिद्धेश जयंत कोसबे आणि महेश वामन पिळणकर यांनी घेतला होता.
अर्जदारांनी महसूल व कर विभागातून मिळवलेल्या कागदपत्रांच्या पडताळणीत, माणगाव नगरपंचायत हद्दीतील मालमत्ता क्र. २२५ (फ्लॅट क्र. B-201, श्री मानजी कॉम्प्लेक्स, कचेरी रोड, उतेखोल, माणगाव) ही विजय तोडणकर यांच्या नावावर असल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे, निवडणूक अर्जात ही महत्त्वाची मालमत्ता पूर्णपणे 'शून्य' (Nil) दाखवण्यात आली होती.
प्रशासनाची कारवाई आणि युक्तिवाद
प्रकरणाची गंभीर दखल घेत श्रीवर्धन तहसील कार्यालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले. प्रशासनाने माणगाव नगर परिषदेकडे मागवलेल्या अहवालात, २८ मार्च २०२३ पासून सदर मालमत्ता अधिकृतपणे विजय सुदाम तोडणकर यांच्या नावावर असल्याचे स्पष्ट झाले.
दुसरीकडे, "पत्नीच्या निधनामुळे वारसाहक्काने ही मालमत्ता नावावर आल्याने नजरचुकीने तिचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात राहिला," असा बचावात्मक युक्तिवाद सरपंच तोडणकरांनी केला होता. तसेच निवडणुकीदरम्यान नगरपंचायतीची कोणतीही थकबाकी नव्हती, असा दावाही त्यांनी केला. मात्र, राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार उमेदवाराने आपली संपत्ती व दायित्वाची अचूक माहिती देणे बंधनकारक असून, शपथपत्रात ती लपवणे मतदारांची फसवणूक व कायदेशीर गुन्हा ठरत असल्याने प्रशासनाने ही कारवाई केली.
पोलिसांना कायदेशीर कारवाईचे निर्देश
महसूल नायब तहसीलदार मनोज माने यांनी पारित केलेल्या आदेशानुसार, सरपंच विजय सुदाम तोडणकर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम २१२ आणि कलम २१६ अंतर्गत तात्काळ गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश श्रीवर्धन पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना देण्यात आले आहेत.
या कारवाईमुळे विरोधक आक्रमक झाले असून नैतिक धोरणाचा हवाला देत सरपंचांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरण्याची शक्यता आहे. या कायदेशीर कारवाईमुळे सरपंच तोडणकरांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.