माणगाव येथे शुक्रवार, २० नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला असून, यामध्ये विविध पक्षांतील नेत्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. तसेच खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या मेळाव्यात भुयारी गटार योजनेवरून विरोधकांना प्रत्युत्तर दिले जाणार आहे.
खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे व आमदार अनिकेत तटकरे यांची प्रमुख उपस्थिती
माणगाव (सलीम शेख)
माणगावच्या राजकीय वर्तुळात विविध पक्षांतील पदाधिकारी, कार्यकर्ते व नगरसेवकांच्या पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार, २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता येथील मराठा समाज भवनाच्या सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याकडे संपूर्ण तालुक्याचे राजकीय लक्ष लागले आहे.
जाहिरात (Advertisement)
या मेळाव्याला रायगडचे खासदार तथा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. अलीकडेच झालेल्या शिवसेनेच्या कार्यक्रमातील विधानांवरून तापलेल्या राजकीय वातावरणामुळे या मेळाव्यात आरोप-प्रत्यारोपांचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भुयारी गटार योजनेवरून विरोधकांना प्रत्युत्तर
मेळाव्याच्या तयारीसाठी बुधवार, १८ नोव्हेंबर रोजी अशोक दादा साबळे विधी महाविद्यालयात पक्षाची महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी पक्षाचे प्रवक्ते ॲड. राजीव साबळे यांनी, खासदार सुनील तटकरे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून माणगाव शहरासाठी जागतिक बँकेच्या माध्यमातून १५७ कोटी रुपयांची महत्त्वाकांक्षी भुयारी गटार योजना मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असल्याचे स्पष्ट केले. तसेच, विरोधकांकडून या योजनेबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवांना नागरिकांनी बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले.
या मेळाव्यात होणाऱ्या पक्षप्रवेशामुळे स्थानिक राजकारणात नवीन समीकरणे तयार होण्यासोबतच आगामी निवडणुकांच्या दृष्टीने पक्षसंघटन मजबूत करण्याबाबत वरिष्ठ नेते मार्गदर्शन करणार आहेत. मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ॲड. राजीव साबळे व तालुकाध्यक्ष काकासाहेब नवगणे यांनी केले आहे.