अलिबाग-बेलकडे मार्गावर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे झालेल्या भीषण वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याने उपचारास उशीर झाला. यामुळे फुगा गिळल्याने प्रकृती गंभीर झालेल्या बामणगाव येथील अवघ्या १ वर्ष ८ महिन्यांच्या आरांश ठाकूर या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
अलिबाग (प्रतिनिधी)
रस्त्याच्या कामामुळे झालेल्या भीषण वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याने उपचारास उशीर झाल्यामुळे, बामणगाव येथील अवघ्या १ वर्ष ८ महिन्यांच्या आरांश सुशील ठाकूर या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे रस्त्यांच्या कामांच्या ढिसाळ नियोजनावर आणि प्रशासनाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त होत आहे.
जाहिरात (Advertisement)
प्राप्त माहितीनुसार, दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास खेळताना आरांशने चुकून फुगा गिळला, ज्यामुळे त्याची प्रकृती अचानक गंभीर झाली. कुटुंबीयांनी तातडीने त्याला रुग्णवाहिकेतून अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे हलवले. मात्र, बेलकडे-अलिबाग मार्गावर रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे तिथे मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
या कोंडीमुळे रुग्णवाहिकेला पुढे जाण्यास तीव्र अडथळा निर्माण झाला. दुपारी साडेतीन-चारच्या सुमारास कशीबशी रुग्णवाहिका जिल्हा रुग्णालयात पोहोचली, तोपर्यंत उशीर झाल्याने डॉक्टरांनी आरांशला मृत घोषित केले.
स्थानिकांकडून संताप आणि प्रशासनावर प्रश्नचिन्ह
रस्त्यांच्या कामादरम्यान प्रशासनाकडून पर्यायी मार्गाची किंवा वाहतूक नियंत्रणाची कोणतीही पुरेशी व्यवस्था करण्यात आली नव्हती, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. आपत्कालीन वाहनांसाठी असा अडथळा जीवघेणा ठरू शकतो, त्यामुळे अशा वेळी स्वतंत्र मार्ग किंवा तात्काळ वाट मोकळी करून देण्याची यंत्रणा असावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
दरम्यान, वाहतूक कोंडीमुळे झालेला विलंबच या बालकाच्या मृत्यूला कारणीभूत ठरला का, हे वैद्यकीय अहवालानंतरच स्पष्ट होईल. या संपूर्ण प्रकरणाची आणि रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.