विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतरही पंचनामा प्रक्रियेत दिशाभूल, मानसिक दबाव आणि धमक्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप समाजसेविका वैदेही सावंत यांनी देवरुख पोलिसांवर केला आहे. घटनास्थळाबाबत वारंवार बदलती उत्तरे दिली जात असल्याने या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून निष्पक्ष चौकशी व तांत्रिक तपासणी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
घटनास्थळाबाबत संभ्रम, मानसिक दबाव आणि धमक्यांचे आरोप; वरिष्ठ स्तरावरून निष्पक्ष तपासाची मागणी
देवरुख (प्रतिनिधी) | दि. १८ नोव्हेंबर
संगमेश्वर तालुका हौशी कबड्डी असोसिएशनने केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानांविरोधात जाहीर निषेध व्यक्त केल्यानंतर, समाजसेविका सौ. वैदेही प्रभावती सुधीर सावंत यांच्या तक्रारीवरून असोसिएशनचे सचिव अभिजित सुर्वे यांच्याविरोधात देवरुख पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७९ व ३५६ अन्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, दि. १३ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतरही सुरू असलेल्या पंचनामा प्रक्रियेत आपली दिशाभूल केली जात असून, मानसिक दबाव व धमक्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप वैदेही सावंत यांनी केला आहे.
जाहिरात (Advertisement)
घटनास्थळाबाबत वारंवार बदलती उत्तरे
वैदेही सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचनामा प्रक्रियेदरम्यान घटनास्थळाबाबत पोलिसांकडून वारंवार वेगवेगळी माहिती दिली जात आहे. सुरुवातीला असोसिएशनचे कार्यालय घटनास्थळ असल्याचे सांगण्यात आले; त्यानंतर कोणतीही पूर्वकल्पना न देता पोलीस थेट त्यांच्या घरी धडकले. पुढे पोलीस ठाण्याचे कार्यालय घटनास्थळ असल्याचे सांगून नंतर 'फिर्यादीनेच घटनास्थळ दाखवायचे असते,' अशी विसंगत उत्तरे देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यापूर्वी दि. ४ नोव्हेंबर रोजीही कोणतीही पूर्वकल्पना न देता पोलीस ठाण्यात बोलावून मोठ्या आवाजात बोलत थेट नोटीस हातात देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
विलंबाचे खापर फिर्यादीवर फोडण्याचा प्रयत्न
पंचनाम्यासाठी सकाळी १० ते १०.३० वाजेपर्यंत बोलावूनही पावणेबारा वाजेपर्यंत कार्यवाही करण्यात आली नाही. उलट या विलंबाची जबाबदारी आपल्यावरच ढकलून रजिस्टर डायरीत नोंद करण्याची धमकी देत मानसिक दबाव आणला गेल्याचे सावंत यांनी म्हटले आहे. दि. १६ नोव्हेंबर रोजी पोलीस ठाण्यात जाऊन पंचनाम्याबाबत विचारणा केली असता, 'वरिष्ठांना विचारून कळवते' असे सांगण्यात आले; परंतु त्यानंतर कोणतीही माहिती दिली गेली नाही. तसेच, त्यांनी दिलेल्या अर्जाच्या पोहोच पावतीवर आवक क्रमांक, संबंधित कर्मचाऱ्याचे नाव व पदनामही नमूद केले नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे.
तांत्रिक तपासणी व वरिष्ठ चौकशीची मागणी
या संपूर्ण प्रकरणाची आणि पंचनामा प्रक्रियेतील कथित अनियमिततेची वरिष्ठ स्तरावरून निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, तसेच संबंधित तक्रार अर्ज टाईप करण्यासाठी वापरण्यात आलेला संगणक किंवा लॅपटॉप तातडीने जप्त करून त्याची तांत्रिक तपासणी करावी, अशी मागणी वैदेही सावंत यांनी केली आहे.
"पोलीस प्रशासन महिलेला न्याय देण्यासाठी आहे की गुन्हेगाराला वाचवण्यासाठी? माझी लढाई सत्य, न्याय आणि आत्मसन्मानासाठी आहे. तपास प्रक्रियेत माझी दिशाभूल न होता निष्पक्ष तपास व्हावा आणि मला न्याय मिळावा, एवढीच माझी अपेक्षा आहे."
— सौ. वैदेही सावंत, समाजसेविका