• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित “संवाद” शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

ByEditor

Jul 11, 2024

क्रीडा प्रतिनिधी
खोपोली :
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनने जिल्ह्यातील सर्व अकॅडमी/क्लब व विविध संघांच्या प्रतिनिधींसाठी संवाद शिबिराचे आयोजन खोपोली येथील महाराज बँक्वेट हॉल येथे केले होते. आगामी 2024/25च्या हंगामासाठी आरडीसीए मार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व वयोगटातील स्पर्धा व कॅम्पसचे आयोजन व रूपरेषा ठरवण्याबाबत या शिबिरामध्ये चर्चा करण्यात आली.

आरडीसीएचे नवनिर्वाचित अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, सचिव प्रदिप नाईक, सदस्य राजेश पाटील, यशवंत साबळे, समीर मसुरकर, ॲड. पंकज पंडित, प्रदिप खलाटे यांनी जिल्ह्यातील क्रिकेटच्या विकासासाठी तयार केलेल्या व्हिजनची माहिती सर्व प्रतिनिधींना दिली. विविध वयोगटातील स्पर्धांमध्ये प्रत्येक संघाचा सहभाग निश्चित व्हावा व सर्व खेळाडूंची नोंदणी जिल्हा क्रिकेट असोसिएशनकडे करून घेण्याचे आवाहन आरडीसीए मार्फत सर्वांना करण्यात आले. नोंदणीकृत झालेल्या सर्व खेळाडूंना ओळखपत्र देण्यात येणार असल्याचे सांगितले. संवाद शिबिरासाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून नयन कट्टा यांनी सुरुवातीला आपले विचार मांडले. कट्टा यांनी रायगड क्रिकेटला दिलेले योगदान व एमसीसी या जागतिक संघटनेने प्रकाशित केलेल्या क्रिकेट नियमांच्या पुस्तकात सुचविलेल्या सुचनांचा समावेश केल्याबद्दल त्यांना आरडीसीए तर्फे सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

प्रख्यात ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. भूषण पाटील यांनी खेळाडूंना मैदानात दुखापत झाल्यानंतर प्रथम उपचारासाठी घेतल्या जाणाऱ्या उपाय योजनांची तसेच खेळाडूंच्या फिटनेस व आहारा विषयीची माहिती सर्व प्रतिनिधींना दिली. जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आगामी क्रिकेट हंगामात सर्व अकॅडमी व संघांच्या प्रतिनिधींना बरोबर घेऊन व नियोजनबद्ध आखणी करून खेळाडूंच्या उत्कर्षासाठी आरडीसीए काम करणार असल्याचे आश्वासन अध्यक्ष अनिरुद्ध पाटील व सचिव प्रदिप नाईक यांनी सर्वांना दिले. संवाद शिबीर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी खोपोली क्रिकेट असोसिएशनचे सदस्य शंकर दळवी, विनोद सोलंकी, सुयोग चौधरी यांनी परिश्रम घेतले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!