विठ्ठल ममताबादे
उरण : जेएनपीटी बंदरासाठी रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील नवीन शेवा गाव हे बोकडविडा येथे स्थलांतरित करण्यात आले होते. मात्र गेली ३७ वर्ष पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. पुनर्वसित नवीन शेवा गावाचे पुनर्वसन १९८७ साली बोकडविरा येथील सर्व्हे नं. ११२ मध्ये एकूण क्षेत्रफळ ३३.६४ हेक्टर जमिनीमध्ये झालेले असताना सिडकोकडून फक्त १० हेक्टरमध्ये नवीन शेवा गावाचे पुनर्वसन करण्यात आले आहे. तसेच उर्वरित जागा सिडकोच्या ताब्यात असून ती जागा ग्रामस्थांना मिळावी म्हणून अनेकवेळा मोर्चा, आंदोलन, उपोषण केली आहेत. अनेक वेळा जेएनपीटी, सिडको, जिल्हाधिकारी रायगड व तहसिलदार उरण यांच्याकडे पत्रव्यवहार करूनसुध्दा आजपर्यंत जागेचा ताबा मिळालेला नाही. माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी विधानभवनामध्ये विनंती अर्ज समिती समोर हा विषय घेतला होता. त्याही वेळेस जमिनीचा ताबा देण्यात यावा असे आदेश अध्यक्षांनी पारित केले होते. तरी सुध्दा सिडकोने त्या आदेशाचे पालन केले नाही.
शेवटी नवीन शेवा ग्रामपंचायतच्या माध्यमातून ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष कमलाकर पाटील यांनी ग्रामस्थांना घेऊन आझाद मैदान, मुंबई येथे गेले तीन दिवस साखळी उपोषण सुरु केले होते व आपल्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देऊन आणि चर्चा करण्यासाठी वेळ मागितली होती. बुधवार, दि. १० जुलै २०२४ रोजी संध्याकाळी मुख्यमंत्री कार्यालयात चर्चेसाठी बोलविण्यात आले. यावेळी माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली सरपंच सोनल घरत, अध्यक्ष कमलाकर पाटील व शिष्टमंडळाने जाऊन मंत्री गिरीश महाजन यांच्याशी सविस्तर चर्चा केली. कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी सिडकोचे एमडी यांना फोन लावून याविषयी मिटिंग लावण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सिडकोच्या एमडी यांनी माजी आमदार मनोहरशेठ भोइर्र यांच्याशी सुद्धा सविस्तर चर्चा केली. चर्चा केल्यानंतर येत्या १२ जुलै २०२४ रोजी सिडको भवन येथे मीटिंग आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन शेवा ग्रामस्थांचे साखळी उपोषण तूर्तास मागे घेण्यात आले आहे.
यावेळी ग्रामसुधारणा मंडळाचे सल्लागार चंद्रकांत घरत, पंडित घरत, उपाध्यक्ष एल. जी. म्हात्रे, उपसरपंच रेखा म्हात्रे, महेश म्हात्रे, देवराम घरत, भूपेन्द्र पाटील, निलेश घरत, मंगेश घरत, अमित भोईर, निहाल घरत, मयूर म्हात्रे,अशोक दरने ,स्वराज ठाकूर, गणेश सुधाकर घरत, आतिश घरत, दर्शन घरत, रुपेश म्हात्रे, लहू पाटील, केतन पाटील, मितेश पाटील, मंगेश गोविंद घरत, विशाल घरत, सागर घरत, पीयूष घरत व कार्यकर्ते उपस्थित होते.