• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरण तालुक्यातील ऑक्सिजन पार्क बनले पर्यटनस्थळ!

ByEditor

Jul 11, 2024

घनःश्याम कडू
उरण :
तालुक्यातील सारडे गावातील ऑक्सिजन पार्क हे पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे. यामुळे पर्यटकांचा ओढा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या पार्कची निर्मिती सारडे विकास मंचच्या माध्यमातून नागेंद्र म्हात्रे या तरुणाने केली आहे. अशा या निसर्गप्रेमी नागेंद्र म्हात्रे याचा आज शुक्रवार, दि. १२ जुलै रोजी वाढदिवसानिमित्त त्यांना पर्यटकांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

सारडे विकास मंचचे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गावातील उजाड माळरान असलेल्या डोंगराचा कायापालट करण्याचा मनोदय उराशी बाळगत त्यादृष्टीने सुरुवात केली. त्यांच्या या प्रयत्नाला काही वर्षांनी यश येत आजच्या घडीला हिरवेगार असे निसर्गरम्य ठिकाण बनले आहे. विविध प्रकारची झाडे लावून त्याचे संगोपन करून संपूर्ण परिसर स्वच्छ व सुंदर बनविला आहे. आज तालुक्यातील नव्हेतर जिल्ह्यातून अनेक पर्यटक या पार्कला भेट देऊन मनमुराद आनंद लुटत आहेत. त्यामुळे अल्पावधीतच कोमनादेवी ऑक्सिजन पार्क म्हणून ओळखले जाऊ लागले.

ऑक्सिजन पार्कचे बदलते स्वरूप हे आजच्या धकाधकीच्या जीवनात होणारी झाडांची कत्तल त्यामुळे माणसाच्या जीवनमानावरही त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. त्यात कोरोना सारख्या महामारीचे संकट आले होते. त्यावेळी ऑक्सिजन अभावी अनेकांना आपले जीव गमवावे लागले होते. हे भयानक दृश्य डोळ्यासमोर ठेवत निसर्गप्रेमी नागेंद्र म्हात्रे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ओसाड माळरानावर पार्क खुलविण्यासाठी जीवापाड मेहनत घेतली. त्यांच्या या प्रयत्नाला काही वर्षांतच यश प्राप्त झाले. त्यानंतर या पार्कचे नाव ऑक्सिजन पार्क असे ठेवण्यात आले. जेणेकरून ऑक्सिजनची कमतरता दूर करण्याचा हा एक प्रयत्न होता.

निसर्गप्रेमी नागेंद्र म्हात्रे व त्यांचे सहकारी पर्यटकांची संख्या वाढावी हे ध्येय मनाशी बाळगत पार्क आकर्षक करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. आजच्या घडीला उरणमधील आकर्षक असे पर्यटन स्थळ म्हणून समजले जात आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी आल्यानंतर परिसर हिरवेगार असल्याचे मनमोहक दृश्य बघूनच डोळ्यांचे पारणे फिटते. तसेच या ठिकाणी एक छोटासा पोहण्यासाठी तलाव असल्याने पावसाळी पर्यटकांचा ओढा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

या ऑक्सिजन पार्कला भेट देण्यासाठी कमी वेळ लागतो. तसेच एक दिवसात हे पर्यटनस्थळ पाहता येते. उरण तालुक्यातील सारडे गावाच्या लगतच हे पार्क आहे. म्हणूनच पर्यटकांनी नक्कीच या ऑक्सिजन पार्कला भेट देऊन निसर्गरम्य ठिकाणाचा आनंद घेण्यास काहीच हरकत नाही. मात्र या पार्कला भेट दिल्यानंतर त्याठिकाणी कोणताही कचरा न टाकता परिसर स्वच्छ ठेवावा असे आवाहन ऑक्सिजन पार्कचे निर्माते नागेंद्र म्हात्रे यांनी केले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!