विनायक पाटील
पेण : मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण” या योजनेपासून पेण शहरातील गरजू महिला वंचित राहू नये याकरिता पेण शहरातील प्रत्येक वॉर्डप्रमाणे दोन दिवसांचा कॅम्प लावून सर्व महिलांना न्याय देण्यात यावा. यासंदर्भात पेण नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा केली असून त्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन येत्या दोन दिवसात पेण शहरातील प्रत्येक वॉर्डात दोन दिवसांचे कॅम्प लावण्याचे आश्वासन दिले असल्याचे सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे यांनी सांगितले.
पेण शहरांमध्ये प्रामुख्याने जिथे गोरगरीब महिला राहतात त्यांना अजूनही याबाबत जनजागृती नसून त्या या योजनेपासून वंचित आहेत. तसेच इतरत्र ठिकाणी या योजनेचे फॉर्म भरण्यासाठी पन्नास रुपये ते दोनशे रुपये पर्यंत लुटमार चालू आहे. याची नोंद घेऊन संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली व याची तात्काळ अंमलबजावणी करा अशी मागणी केली आहे. तरी याबाबत सर्व महिलांनी आपले फॉर्म प्रत्येक वॉर्डातील नेमलेल्या ठिकाणी भरून घ्यावेत. तसेच ज्यांना शक्य होईल त्यांनी लवकरात लवकर स्वतः ऑनलाईन पद्धतीने हे फॉर्म भरल्यास आपणास त्या योजनेचा लाभ घेता येईल असे ही त्यांनी सांगितले.
पेण तालुक्यातील इतरही ग्रामीण भागात पेण तहसीलदारांमार्फत जर का अशा पद्धतीने व्यवस्था केलेली नसेल तर ग्रामसेवकांमार्फत अथवा तलाठ्यांमार्फत माझी लाडकी बहीण योजनेची माहिती ग्रामपंचायत पातळीवरती देऊन वंचित महिलांचे फॉर्म भरून घेण्यास सहकार्य करावे. तसेच तालुक्यातील सर्व नागरिकांनी याची गाव पातळीवर जनजागृती करून वंचित महिलांना न्याय देण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्त हरीश बेकावडे यांनी केले आहे.