क्रीडा प्रतिनिधी
रायगड : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्यावतीने घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पंच व स्कोअरर्स परिक्षेसाठीच्या पूर्वतयारीसाठी रायगड जिल्हा क्रिकेट अससोसिएशनने दि. १० जुलै रोजी खोपोली येथील महाराजा बँक्वेट हॉल येथे बीसीसीआयचे पंच रोहन इंगवले व बीसीसीआयच्या स्कोअरर केतकी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व क्रिकेट पंच व स्कोअरर्स यांच्यासाठी शिबिराचे आयोजन केले होते.

महाराष्ट्र क्रिकेट अससोसिएशनने ह्यावर्षी राज्यातील पंच व स्कोअरर्सच्या मुख्य परीक्षेसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने आधी पूर्वचाचणी परीक्षा (स्क्रीनिंग टेस्ट) घेण्याचे ठरविले आहे. रायगड जिल्ह्यातून पंच परीक्षेसाठी ५६ तर गुणलेखक/स्कोअरर्ससाठी २० उमेदवारांनी परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. पूर्वचाचणी परीक्षा २१ जुलै रोजी पुणे येथे एमसीए मार्फत घेण्यात येणार आहे. ह्या परीक्षेत किमान ८०% पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या उमेदवारांनाच मुख्य परीक्षेसाठी बसता येणार असल्याचे एमसीएकडून जाहीर करण्यात आले आहे. गतवर्षीच्या राज्यस्तरीय पंच पॅनल परिक्षेत रायगड जिल्ह्यातून उत्तीर्ण झालेले ॲड. पंकज पंडित व सुयोग चौधरी यांचा सत्कार आरडीसीए मार्फत करण्यात आला. बीसीसीआयचे पंच रोहन इंगवले व बीसीसीआयच्या स्कोअरर केतकी नाईक यांनी उपस्थित सर्वांना सुरेख मार्गदर्शन केल्याबद्दल आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, सचिव प्रदिप नाईक, सदस्य यशवंत साबळे, राजेश पाटील, समीर मसुरकर, ॲड. पंकज पंडित, प्रदिप खलाटे, शंकर दळवी, विनय पाटील, चंद्रकांत म्हात्रे, विनोद सोलंकी यांनी त्यांचे आभार मानले.
