• Fri. Jun 27th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

माथेरानमध्ये लुईसा पॉईंटच्या दरीमध्ये सापडले भोगटे दाम्पत्याचे शव

ByEditor

Jul 17, 2024

गणेश पवार
कर्जत :
माथेरानमध्ये लुईसा पॉईंटच्या दरीत माथेरानमध्ये फिरावयास आलेल्या भोगटे दाम्पत्याचे शव सापडले असून दोन दिवसांच्या अथक परिश्रमानंतर सह्याद्री रेस्क्यू टीमने रात्री उशिरा त्यांचे शव दरीतून बाहेर काढले.

11 जुलै रोजी पार्थ भोगटे (वय 46) व श्रीलक्ष्मी भोगटे (वय 46) रा. राजापूर, रत्नागिरी येथील दाम्पत्य माथेरानमध्ये फिरण्यास आले. ते ब्राईट लँड हॉटेलपासून इको पॉइंटच्या दिशेने गेले असता ते पुन्हा हॉटेलमध्ये आले नाही. 14 जुलैला रुद्राक्ष भोगटे यांनी माथेरानमध्ये येऊन पोलीस ठाण्यात पार्थ व श्रीलक्ष्मी हरवल्याची तक्रार दाखल केली. त्याअनुषंगाने माथेरान पोलीस ठाण्याकडून माथेरानमध्ये सर्वत्र तपास करण्यात आला. सोशल मीडियाद्वारे सुद्धा तपास करण्यात आला. पण काही धागेदोरे मिळत नव्हते. अखेर मोबाईल टॉवरच्या नेटवर्कच्या साहाय्याने त्यांचे लोकेशन तपासून माथेरानमधील सह्याद्री मित्र आपत्कालीन सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने शारलोट तलाव दरी, इको पॉइंट दरी येथे सर्च ऑपरेशन सुरू केले. जोरदार पाऊस, त्यात धुके असताना देखील या संस्थेने दरीमध्ये तपास सुरू केला.

दि.14 रोजी या दोन्ही दरी पालथ्या घातल्यानंतर 15 जुलै रोजी त्यांनी लुईसा पॉईंट दरी तपासण्याचे काम हाती घेतले. संस्थेचे अध्यक्ष वैभव नाईक, सुनील कोळी, अमित कोळी, चेतन कळंबे, उमेश मोरे, महेश काळे, सुनील ढोले, अक्षय परब, धीरज वालेंद्र, रुग्णवाहिका चालक अमोल सपकाळ व अजिंक्य सुतार तसेच येथील स्थानिक गोविंद झोरे, दर्शन सावंत व हशाच्या पट्टी या आदिवासी गावातील सुरेश पारधी यांनी पूर्ण दरी तपासण्यास सुरुवात केली. अखेर लुईसा पॉईंट येथील लायन्स हेड या टापूच्या खाली या दोघांचे शव आढळून आले. पण धुके आणि पावसामुळे ते शव आणण्यास व्यत्यय येत होता. अखेर 16 जुलैला रात्री 2 वाजता हे शव दरीतून बाहेर काढण्यात यश आले. येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सोनोने, सहाय्यक फौजदार गणेश गिरी घटनास्थळी हजर होते.

गोगटे दाम्पत्याने आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत असून याबाबत अधिक तपास माथेरान पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार गणेश गिरी करत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!