खासदार सुनील तटकरे यांना दिले निवेदन
विनायक पाटील
पेण : पेण नगरपरिषदेचे माजी नगरसेवक निवृत्ती पाटील यांनी खासदार सुनील तटकरे यांना रोहित कॉम्प्लेक्स इमारतीचे रुम निहाय स्वतंत्र मुल्यांकन करून मुल्यांकन मिळण्याची मागणी केली असून त्याबाबत खासदार सुनील तटकरे यांना निवेदन दिले आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणात रामवाडी पेण येथील निवासी रोहीत कॉम्प्लेक्स या इमारतीचा सर्वे नंबर १८६/अ हिस्सा नंबर – २, प्लॉट नंबर – १ त्यांचे रुमनिहाय स्वतंत्रपणे मुल्यांकन करावे व सुधारीत भूसंपादन कायदा २०१३ नुसार दर मिळाला पाहिजे. अशी इमारतीमधील रहिवाशांची पूर्वीपासून मागणी आहे. याबाबत दिनांक 13/8/2013 च्या पत्रान्वये निवाडा सादर करण्यात आला होता. काही त्रुटी उणिवांबाबत जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे बैठका घेतल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी विषेश बाब म्हणून प्रस्तावित सर्व्हे नंबरसाठी रु. 1814/- इतका दर निश्चित केला होता. तो बाजारभावानुसार कमी असून देखील संबंधीत रहिवाश्यांनी माणूसकीची जाण ठेवून सदर रस्त्याचे व ब्रिजचे काम करून दिले. मात्र, काम झाल्यानंतर ठेकेदाराच्या इंजिनिअरकडून मार्किंग चुकल्याने रस्ता रोहित कॉम्प्लेक्सच्या बाजूकडील जागेत सरकला. ही चूक आजपर्यंत सुधारली गेली नाही. त्यामुळे ईमारती समोरील सर्व्हिस रस्त्याला मोजकीच जागा शिल्लक राहिली. सद्य परिस्थितीत त्यातून वाहतूक सुरू झाल्यास सदर इमारतीला वाहनांची वर्दळीने धोका होऊ शकतो. तसेच रोहित कॉम्प्लेक्सची जागाही जात असल्याने रहिवाश्यांना मोठा प्रश्न पडला आहे.

याबाबत प्रशासनाने लक्ष न दिल्यास सदरचे रहिवासी आक्रमक भूमिका घेऊन प्राणांतीक आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा निवृत्ती पाटील यांनी दिला आहे. रोहीत कॉम्प्लेक्स रहिवाशांना भूखंडाचा मोबदला मिळालाच पाहिजे. येथील पाणी निचरा, गटाराचे काम पूर्ण झाले पाहिजे. प्रलंबित असलेल्या सर्व्हिस रस्त्याचे काम जलदगतीने पूर्ण करून परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर करण्याची मागणीही नगरसेवक निवृत्ती पाटील यांनी केली आहे.
तत्कालीन प्रांत अधिकारी प्रतिमा पुदळवाड आणि विठ्ठल इनामदार यांनी याबाबत फक्त आश्वासन दिले. परंतु ठेकेदार इंजीनियर यांच्या चुकीच्या मार्किंगमध्ये सुधारणा केली नसल्याची बाबही त्यांनी निदर्शनास आणून दिली. याबाबत त्वरित स्थळपाहणी करून संबंधीत प्रश्न सोडविण्याच्या सूचना खासदार सुनील तटकरे यांनी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व संबंधितांना दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार तानाजी शेजाळ, मुख्याधिकारी जीवन पाटील, महामार्गाचे प्रोजेक्ट डायरेक्टर यशवंत घोटकर यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, ठेकेदार, इंजिनिअर व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.