आपत्कालीन विभाग, रोहा पोलीस व रेस्क्यू टीमची यशस्वी कामगिरी
शशिकांत मोरे
धाटाव : कुंडलिका नदी पुलावरून बुधवारी सकाळी ९.३० च्या दरम्यान एक अज्ञात इसमाने पुलावरून उडी मारली होती. या इसमाचा शोध वेगाने चालू होता. अखेर आज शुक्रवारी दुपारी १.३० वाजता आपत्कालीन विभाग, रोहा पोलीस व महाड , माणगाव व कोलाड येथील रेस्क्यू टीमने तसेच स्थानिक ग्रामस्थ यांच्या मदतीने मृतदेह चणेरा खाडीनजीक चोरडे गावालगतच्या नदीपत्रातून बाहेर काढण्यात आला. तर या मृत व्यक्तीचे नाव संजय पाबरेकर असुन तो भुवनेश्वर येथील रहिवासी असल्याचे समोर आले. या इसमाचा मृतदेह रोहा उपजिल्हा रुग्णालय येथे शवविछेदनासाठी आणण्यात आला आहे.
रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीपात्रात रोहा अष्टमी पुलावरून संजय पाबरेकर यांनी उडी मारली होती. रोहा उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा पोलीस निरीक्षक देवीदास मुपडे यांनी रोहा पोलीस स्टेशनची १२ जणांची टीम, आपत्कालीन विभाग, माणगाव व महाड येथील साळुंके रेस्क्यू टीम तसेच कोलाड येथील सह्याद्री वन जीवन रेस्क्यू टीम यांनी गेले दोन दिवस या इसमाचा शोध सातत्यपूर्ण घेतला.
मागील तीन दिवस पावसाने चांगलाच धुमाकूळ घातल्याने कुंडलिका नदी ही सध्याच्या परिस्थितीत दुथडी भरून वाहत असल्यामुळे इस्मास शोधण्यास अडथळे निर्माण होत होते. परंतू शुक्रवार सकाळपासूनच युद्ध पातळीवर शोध मोहीम चालू केली असता अखेर त्यांना यश मिळाले. प्रशासनाने जिगरीचे प्रयत्न करून मृत संजय पाबरेकर याचा मृतदेह शोधून काढला. दरम्यान, इसमाचा मृतदेह रोहा उपजिल्हा रुग्णालय येथे शवविछेदनसाठी आणण्यात आला आहे.