सतर्क नागरिकांच्या प्रयत्नाने अमानुषपणे जनावरांना कारमध्ये चोरून नेण्याचा प्रयत्न फसला
शशिकांत मोरे
धाटाव : रोहा शहरात सध्या गुन्हेगारीच्या धक्कादायक घटना घडत आहेत. रोह्यात यशवंतखार येथून बैल चोरणाऱ्या होंडा सिटी कारचा पाठलाग करून सतर्क नागरिकांच्या प्रयत्नाने अमानुषपणे जनावरांना कारमध्ये चोरून नेण्याचा प्रयत्न काल रात्री फसला. आज येथे गोवंशीय जनावरं चोरणारी टोळी सक्रिय झाल्याने पशुपालक आणि शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
रविवारी ४ ऑगस्ट रोजी रात्री १२ वा.च्या सुमारास यशवंतखार येथून होंडा सिटी कारमध्ये बैल चोरून घेऊन जात असल्याचा नागरिकांना संशय आला. या नागरिकांनी लगेचच होंडा सिटी कारचा पाठलाग केला असता नागोठण्याजवळ तस्करांच्या गाडीचा टायर फुटल्याने ही कार नागरिकांच्या हाती लागली. या कारमध्ये बैलांना दाटी-वाटीने आणि अमानुषपणे कोंबून बसवण्यात आल्याचे पहावयास मिळाले. नागरिकांनी गुरे तस्करांची सिल्वर रंगाची होंडा सिटी कार क्रमांक एमएच ०६ एडब्ल्यू २६२९ ताब्यात घेतल्यानंतर गुरे तस्करांना देखील पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, या झटापटीत एक तस्कर नागरिकांच्या हाती लागला तर अन्य तिघांनी पळ काढला.
या घटनेबाबत रोहा पोलीस ठाण्यात ५ ऑगस्ट रोजी १५४/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३०३ (२) प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम १९६० कलम ११(१)(ए), ११(१)(सी) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर रोह्याचे पोलीस निरीक्षक देविदास मुपडे यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा पोलीस नाईक शिरसाठ हे अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, रोह्यात यशवंतखार येथून बैल चोरणाऱ्या होंडा सिटी कारचा पाठलाग करून सतर्क नागरिकांच्या प्रयत्नाने अमानुषपणे जनावरांना कारमधून चोरून नेण्याचा प्रयत्न मात्र फसला आहे.