• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

चुलत भावाचा खुन केल्याप्रकरणी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा

ByEditor

Aug 6, 2024

माणगाव सत्र न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय

सलीम शेख
माणगाव :
चुलत भावाचा खुन केल्याप्रकरणी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा माणगाव सत्र न्यायालयाने सुनावली आहे. सदरची घटना ही मौजे मजगांव बौध्दवाडी, ता. तळा, जि. रायगड येथे फिर्यादी हिरामण उर्फ हिरानंद पांडूरंग जगताप व पुतण्या आरोपी रवि जगताप यांचे राहते घराचे पडवीत दि. १६ फेब्रुवारी २०१९ रोजी ३.३० ते ७.२८ वा.च्या दरम्यान म्हसळा पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली होती.

सदर घटनेची थोडक्यात हकीकत अशी की, दि. १६ फेब्रुवारी २०१९ रोजी दुपारी ३.३० वा.चे सुमारास आरोपी रवि उर्फ रविंद्र सोनू जगताप (वय ३८, रा. मजगांव बौध्दवाडी, ता. तळा, जि. रायगड) याने फिर्यादी हिरामण उर्फ हिरानंद पांडूरंग जगताप, रा. मजगांव बौध्दवाडी, ता. तळा, जि. रायगड याचेशी नारळाची झाडे तोडली यावरून झालेल्या वादाचा व फिर्यादी यांची पत्नी शिवीगाळी करते याचा राग मनात धरून फिर्यादी यांचा मुंबईहुन आलेला मुलगा दिपक हिरामण जगताप यांस चाकू व कोयत्याने खांद्यावर व पोटावर वार करून जीवेठार मारले.

वरील घटनेची फिर्याद म्हसळा पोलिस ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला. या गुन्हयाचा तपास म्हसळा पोलीस ठाण्याचे सहा. पोलिस निरीक्षक पी. ए. कोल्हे यांनी केला व सदरचे दोषारोप पत्र भा.द.वि.क. ३०२ अन्वये मा. जिल्हा व सत्र न्यायालय माणगाव येथे दाखल केले. सदर खटल्याची सुनावणी मा. अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश माणगाव-रायगड येथे झाली. सदर खटल्यामध्ये अति. शासकिय अभियोक्ता जितेंद्र डी. म्हात्रे यांनी सरकार पक्षाच्या वतीने काम पाहिले व याकामी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तपासून कोर्टासमोर प्रभावीपणे युक्तिवाद करून महत्वाचे न्यायनिर्णय दाखल केले. सदर केसच्या सुनावणी दरम्यान पैरवी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक दिनेश आघाव, सहा. फौजदार शशिकांत कासार, पोह शशिकांत गोविलकर, मपोह छाया कोपनर, पोशि सोमनाथ ढाकणे यांनी सहकार्य केले. तसेच मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश हर्षल भालेराव यांनी सदर घटनेतील गुन्ह्याच्या शाबीतीनंतर यांनी सदर घटनेतील आरोपी यांना दि.६ ऑगस्ट २०२४ रोजी दोषी धरून भा.द.वि. क. ३०२ अन्वये जन्मठेप व रू. दंडाची रक्कम १५,०००/- रु. ची शिक्षा ठोठावली. या प्रकरणी मयत दिपक जगताप यांस न्याय मिळाला म्हणून त्याच्या आई-वडिलांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!