शशिकांत मोरे
धाटाव : रोहा तालुक्यातील देवकान्हे गावातील मराठी शाळेच्या पटांगणात दोन विद्यार्थी खेळत होते. त्यांच्यात खेळण्याच्या कारणावरून धक्काबुक्की झाली असता त्याठिकाणी फवारणी करणाऱ्या इसमाने एका विद्यार्थ्याला कानाखाली व पाठीवर हाताने मारहाण केल्या प्रकरणी रोहा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, रोहा तालुक्यातील देवकान्हे गावातील मराठी शाळेच्या पटांगणात विराट येलकर आणि सम्यक जाधव हे दोघं खेळत होते. त्यांच्यात खेळण्याच्या कारणावरून धक्काबुक्की झाली असता त्याठिकाणी फवारणी करणारे उमाजी कोंडे या इसमाने विराट येलकर या विद्यार्थ्याच्या कानाखाली व पाठीवर हाताने मारहाण केली. या प्रकरणी आरोपी कोंडे यांच्या विरोधात फिर्यादी राकेश येलकर याने तक्रार दिली आहे.
दरम्यान, या घटनेबाबत गु.र.नं. १५५/२०२४ बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम २०१५ चे कलम ७५ प्रमाणे बालकास दुखापत करणे याप्रकरणी रोहा पोलिसात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोह्याचे पोलीस निरीक्षक देविदास मूपडे यांच्या मार्गदर्शनाखाली ए. ए. म्हात्रे व सहकारी या गुन्ह्याबाबत अधिक तपास करीत आहेत.